पुणे : पुणे शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्याच्या पुणे महापालिका आणि पीएमपीएल मार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील आयटी हब म्हणून ओळख असणार्या हिंजवडी,खराडी,मगरपट्टा या परिसरात माहिती तंत्रज्ञान विभागात काम करणार्या नोकरदार व्यक्तीसाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून इलेक्ट्रिक डबलडेकर बस ची सेवा दिली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कात्रज आगार ते हिंजवडी दरम्यान डबलडेकर बस ची पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या उपस्थितीमध्ये यशस्वी चाचणी पार पडली.
यावेळी पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे म्हणाले,पुणे शहरातील हिंजवडी, खराडी,मगरपट्टा या परिसरातील आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांसाठी पीएमपीएल प्रशासनाने चेन्नई येथील ‘स्विच’ कंपनीकडून एक इलेक्ट्रिक ‘डबलडेकर’ बस मागवली आहे. त्या एका बस ची किंमत २ कोटी रुपये असून ८५ प्रवाशांची आसन व्यवस्था आहे. खालील बाजूला ४५ आणि वरील बाजूला ४० प्रवासी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या बसमध्ये सीसीटीव्ही असून जेणेकरून बसमधील प्रत्येक बाबीवर लक्ष देणं सोयीचे ठरणार आहे.
तसेच आम्ही चार मार्गावर १० ते १५ दिवस ही चाचणी करणार असून त्या सर्व मार्गावर चाचणी यशस्वी ठरल्यानंतर प्रशासकीय सर्व प्रक्रिया पार पाडून दिवाळीपर्यंत पुणेकर नागरिकांच्या सोयीसाठी डबलडेकर बस ची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.