गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेसह चौघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. उरळीकांचन आणि लोणीकाळभोर परिसरात कारवाई करून साडेआठ लाख रुपयांचा ४३ किलो गांजा तसेच मोटार असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उरळी कांचन परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर आणि पथक गस्त घालत होते. त्या वेळी एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मोटार अडवली. मोटारीतील दिनेश सोपान काळे (वय ३१, रा. सालचे ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. मोटारीतून ४ लाख १८ हजार रूपयांचा २० किलो ७५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण तपास करत आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर परिसरात आणखी कारवाई करण्यात आली. गांजा विक्री प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली. ओंकार पाडुरंग गुरव (वय २२), अमोल हनुमंत पवार (वय २७) आणि सुरेखा प्रशांत पवार (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ३१ हजारांचा २२ किलो गांजा जप्त करण्यात आला.