पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यासह संपूर्ण देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी आता अपल्वयीन आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांचा छोटा राजनशी संबंध असल्याच्या संशयावरून गुरुवारी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांचीही चौकशी करण्यात आली.

दरम्यान, ज्यावेळी त्याच्या आजोबाला पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले, त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या एका व्यक्तीने पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. हा व्यक्ती आरोपीच्या कुटुंबियांचा नातेवाईक असल्याचे सांगितलं जात आहे.

हेही वाचा – बालसुधारगृह म्हणजे काय? पुणे पोर्श अपघातातील आरोपीचा दिनक्रम कसा असेल?…

आरोपीच्या आजोबाला चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले, त्यावेळी पत्रकाराकडून या घटनेचे वार्तांकन सुरु होते. यावेळी तुम्ही व्हिडीओ का काढत आहात? असं विचारात आरोपीच्या नातेवाईकाने पत्रकारांनी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. तसेच कॅमेराही हिसकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात मिळवले.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी आरोपीच्या आजोबाला पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावले होते. कुख्यात छोटा राजनसोबत असलेल्या संबंधाच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात त्यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.