लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पिझ्झा-बर्गरवर ताव मारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाचे खाण्या-पिण्याचे चोचले १४ दिवसांसाठी बंद झाले आहेत. त्याला आता बालसुधारगृहात सकाळी न्याहारीमध्ये पोहे आणि जेवणात पोळी-भाजी दिली जात आहे. त्यामुळे ऐशोआरामात जीवन जगणाऱ्या अल्पवयीनाची धुंदी काही दिवसांसाठी तरी उतरली आहे.

आलिशान मोटार चालवीत दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचा जामीन न्यायालयाने मंगळवारी (२२ मे) रद्द केला. त्यानंतर त्याला १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठविण्यात आले. दारूच्या नशेमध्ये भरधाव गाडी चालवीत अल्पवयीनाला पहिल्यांदा बाल न्याय मंडळाने जामीन दिला होता. मात्र, या प्रकरणात सर्व स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर पुणे पोलिसांनी दुसऱ्यांदा दाखल केलेल्या अर्जानुसार अल्पवयीनाला बालसुधारगृहात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धनिकपुत्राला आता १४ दिवस बालसुधारगृहात काढावे लागणार आहेत. त्यासोबतच त्याला सुधारगृहाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

आणखी वाचा-विक्री न झालेल्या घरांची संख्या होतेय कमी! जाणून घ्या तुमच्या शहरातील स्थिती…

कायद्यापुढे सर्वजण समान असल्याची जाणीव निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून अल्पवयीनाला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. त्याला सकाळी दिल्या जाणाऱ्या न्याहारीमध्ये पोहे, दूध, अंड्याचा समावेश आहे. त्यानंतर प्रार्थना, समुपदेशन केले जात आहे. दुपारी आणि संध्याकाळी साधे जेवण दिले जात आहे. अल्पवयीन मुलाला घरून आलेले कोणतेही खाद्यपदार्थ देता येत नाही. त्यामुळे पिझ्झा-बर्गरची चव चाखणाऱ्या अल्पवयीनाला बालसुधारगृहातील न्याहारी आणि जेवणावरच दोन आठवडे काढावे लागणार आहेत.