पुणे : पुणे कृषी उत्पन्न समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सोमवारी राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्याकडे राजीनामा सोपविला. काळभोर यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जगताप यांनी सांगितले.
काळभोर यांच्या राजीनाम्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यांनी सोमवारी दुपारी उपनिबंधक जगताप यांच्याकडे राजीनामा सोपविला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी सभापती ज्येष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, प्रशांत काळभोर, रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी यांच्यासह संचालक या वेळी उपस्थित होते. तरतुदीनुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डाॅ. राजाराम धोेंडकर हे नवीन सभापती निवडीसाठी संचालक मंडळाची सभा घेतील.
या सभेत नवीन सभापतींची निवड केली जाणार आहे. ‘माझी ९ मे २०२३ रोजी सभापती पदावर निवड झाली. सभापतिपदाच्या कार्यकाळात बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली. बाजार विकासासाठी सर्व संचालक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. यापुढील काळात बाजार समितीच्या विकासात माझा सहभाग राहील,’ असे मावळते सभापती दिलीप काळभोर यांनी नमूद केले.