पुणे : नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन रस्ता) वाहतूक पोलिसांनी बेशिस्तांविरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांद्वारे (एआय) कारवाई करण्यास सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यांत तीन हजार २०० बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध एआय कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दुहेरी पार्किंग करणाऱ्या एक हजार २८४ वाहनचालकांचा समावेश आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. डेक्कन जिमखाना भागातील नामदार गोखले रस्त्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले. २८ मे राेजी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. अतिरिक्त पाेलीस आयुक्त मनोज पाटील या वेळी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांत नामदार गोखले रस्त्यावर वाहतूक नियमभंग करणाऱ्या तीन हजार २०० वाहनचालकांंविरुद्ध कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सम-विषम दिनांक न पाहता वाहन लावणे, एकाच दुचाकीवरून तिघांचा प्रवास, वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे वाहनचालकांना टिपत असून, नियमभंग केल्यास त्वरित वाहनचालकांना स्वयंचलित पद्धतीने संदेश मिळतो. नियमभंगानंतर साधारणपणे मिनिटभरात वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. नामदार गोखले रस्त्यावर वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर बेशिस्तपणे मोटारी लावण्यात येत होत्या. त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांसह या भागातील दुकानदार, तसेच पादचाऱ्यांना होत होता. एआय कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर नियमभंग करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

एआय कॅमेऱ्यांद्वारे कारवाई

नियमभंगाचा प्रकार कारवाईची संख्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • नो पार्किंग………………….१,२७९
  • दुहेरी पार्किंग………………१,२८४
  • विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ……६१७
  • एकाच दुचाकीवरून तिघांचा प्रवास………..३२
  • मोबाइलवर संभाषण…………..८

‘पीटीपी ट्रॅफिकाॅप’वर सहा हजार तक्रारी

वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पीटीपी ट्रॅफिकाॅप ॲप सुरू केले आहे. या मोबाइल ॲपद्वारे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे छायाचित्र नागरिक वाहतूक पोलिसांना पाठवू शकतात. १५ जूनपासून आतापर्यंत पाच हजार ७७२ तक्रारी नागरिकांनी या ॲपच्या माध्यमातून केल्या आहेत. त्यापैकी चार हजार ३९९ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. काही नागरिकांनी अपूर्ण माहिती पाठविल्याने एक हजार २८० तक्रारींचा विचार करण्यात आला नाही.