पुणे : पुणे ते दिल्ली प्रवासासाठी हवाई प्रवाशांना जेवढा कालावधी लागतो, प्रसंगी त्याहून दुप्पट कालावधी प्रवाशांना घरून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी लागत आहे! खड्डेमय रस्ते, पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांवर ही परिस्थिती ओढवत आहे. त्यातच विमानतळावर पोहोचल्यावर सुरक्षा तपासणीतही बराच कालावधी जात असल्याने अनेक प्रवाशांना कसेबसे अखेरच्या क्षणी विमानात पाऊल ठेवता येत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे विमानतळ प्राधिकरणानेच सूचनापत्र प्रसिद्ध करून प्रवाशांना विमानाच्या नियोजित वेळेआधी दोन तास विमानतळावर पोहोचावे, असे आवाहन केले आहे.

शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका विमान प्रवाशांनाही बसत आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी तासभर आधी पोहोचण्याच्या दृष्टीने नियोजन केले, तरी विविध कारणांमुळे होणाऱ्या कोंडीमुळे पोहोचायला उशीर होत असून, त्यातच विमानतळावर सुरक्षा तपासणी, बोर्डिंग यातही बराच वेळ जात असल्याने आयत्या वेळी प्रवाशांची धावपळ होताना दिसते. विमाने चुकण्याचेही प्रकार घडतात.

या पार्श्वभूमीवर, ‘प्रवाशांनी उड्डाण चुकू नये, म्हणून विमानतळावर दोन तास अगोदर वेळेत पोहोचावे. पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला असून, चेक-इन आणि सुरक्षा तपासणीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे,’ असे विमानतळ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्रात नमूद केले आहे.

विमान कंपन्यांनीही प्रवाशांना पूर्वतयारी करण्याचे आवाहन केले आहे. अकासा एअरने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई व गोव्यातील पावसामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांनी अतिरिक्त वेळ गृहीत धरून प्रवास करावा, तसेच विमानतळावर पोहोचण्यापूर्वी उड्डाणाची स्थिती तपासावी, असे अकासा विमान कंपनीने म्हटले आहे.

माझे काल बेंगळुरूला विमान होते. घरून चार तास आधी निघालो. पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. कसाबसा टर्मिनलवर पोहोचलो खरा, परंतु तेथून पुढे जवळपास एक तास सुरक्षा तपासणीत गेला. सहकुटुंब प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अत्यंत त्रासदायक आहे. – कल्पेश झा, विमान प्रवासी.

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने, विमानतळावरील गर्दी आणि तपासणीतील विलंब कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी घरून निघताना पुरेसा वेळ ठेवावा. दोन तास अगोदर विमानतळावर पोहोचता येईल, असे नियोजन करावे. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमाननतळ.