पुणे : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर असल्याचे ‘सीसीटीव्ही’त आढळून आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पुन्हा विमानतळ परिसरात पिंजरे आणि जाळ्या बसविल्या आहेत. बिबट्याची लपून बसण्याची; तसेच खाद्याच्या शोधात विमानतळ परिसरात प्रवेश करत असलेली जागा वन विभागाने शोधली असून, ती जागा प्रतिबंधित करण्यात आली आहे.

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बिबट्याला लवकर पकडण्यासाठी वन विभाग आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. पुणे विमानतळ परिसरात बिबट्या, श्वान आणि पक्ष्यांमुळे विमानांच्या उड्डाणात अडथळे येत आहेत. तसेच विमानतळाच्या आजुबाजूच्या परिसरात अस्वच्छता, बेकायदा इमारती, वाहतूक कोंडी या समस्या आहेत.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी मोहोळ यांनी बुधवारी पुणे महापालिकेमध्ये बैठक घेतली. या बैठकीला महानगरपालिका, विमानतळ प्राधिकरण, हवाई दल, वन विभाग, पुणे कटक मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘विमानतळ परिसरात बिबट्याला प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने पिंजरे, जाळ्या लावल्या आहेत. कॅमेरे, सीसीटीव्ही यांच्या माध्यमातून बिबट्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. लवकरच बिबट्या पकडला जाईल.’

‘प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत चर्चा झाली असून, समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूला दाट लोकवस्ती आणि इमारती असल्याने परिसरात अस्वच्छता आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले आहे. प्राणी-पक्षांना खाद्य उपलब्ध होत असल्याने त्यांचा अधिवास वाढला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’

बिबट्या आढळल्याची तिसरी वेळ

पुणे विमानतळ परिसरात २८ एप्रिल रोजी पहिल्यांदा बिबट्या आढळून आला. विमानतळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर बिबट्या असल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये आढळून आले होते. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या आणि पिंजरे लावले. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. मे महिन्यात वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचून एका पिंजऱ्यात भक्ष म्हणून कोंबडी ठेवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, बिबट्या पिंजऱ्यात येऊन कोंबडी घेऊन अलगद बाहेर पडला. याबाबत उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनीही कबुली दिली आहे. त्यानंतर बिबट्या आढळून आला नसल्याने तो परिसरातून गेला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या फिरत असल्याचे ‘सीसीटीव्ही’त आढळून आले आहे. वन विभागाने विमानतळ परिसरात जुन्या नैसर्गिक जलवाहिन्या, मैलावाहिन्यांची जागा निश्चित करून त्या बंद केल्या आहेत.