पुण्यात जैव सुरक्षा स्तर नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी माणसाचे आणि प्राण्याचे जीवाभावाचे नाते असल्याचे म्हणून पशुपालन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

“नागरी आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये माणूस आणि प्राण्याचे जीवाभावाचे नाते आहे. कृषीसंस्कृतीमध्ये पशुपालनाचे मोठे महत्त्व आहे. शेतावरच्या वस्तीवरही कुत्रे पाळले जातात. माणसाचे सच्चे साथीदार म्हणून हे प्राणी आहेत. देवदेवतांच्या प्रतिमांसोबतही कुठलातरी प्राणी पाहायला मिळतो. शेवटच्या प्रवासाला यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळदेखील रेडा दाखवलेला आहे. म्हणून माणसाचे आणि प्राण्याचे नाते अनेक शतकांपासून आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास सुरु करण्याअगोदरच्या शेतीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. “दत्ता भरणे जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा माझा भाऊही त्यांच्यासोबत होता. माझे वडिल आम्हाला लवकर सोडून गेल्यानंतर माझ्यावरु कुटुंबाची जबाबदारी आली. त्यावेळी मी शेती करायला लागलो. मला आधार देण्याचे आणि आर्थिक सक्षम करण्याचे काम पोल्ट्री आणि डेअरीच्या व्यवसायाने केले. तुमचा विश्वास बसणार नाही. त्या काळामध्ये एक गाय विकली तर त्या किमतीतून एक एकर जमीन विकत घेत होतो, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. माझ्या बांधाच्या समोर चार एकरांचा एक प्लॉट विकायला निघाला होता. मी चार गायी विकल्या आणि त्या पैशातून मला चार एकर जमीन मिळाली. पण आज ते अशक्य आहे कारण जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने हा व्यवसाय केला तर शेतकऱ्याला मोठा हातभार लागतो. हे मी स्वतः अनुभवले आहे आणि त्यामुळे मी सांगत आहे,” असे अजित पवार म्हणाले.

 शाकाहारी लोकांची पंचायत झाली – अजित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला जेव्हा गेल्या वर्षी करोना झाला आणि डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यातून बाहेर पडलो. त्यावेळी डॉक्टर पोष्टीक आहार म्हणून पाया सूप प्यायला सांगत होते. जे सांगत होते मांसाहारीच सांगत होते. त्यामुळे जे शाकाहारी आहेत त्यांची पंचायत झाली. शाकाहारी आणि मांसाहारी हे पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. त्यामुळे त्याबद्दलची प्रत्येकाची वेगळी मते असू शकतात,” असेही अजित पवार म्हणाले.