आळंदी : आळंदीत पोटच्या मुलांनी ७५ वर्षीय बापाला बेवारस सोडून दिल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. निवृत्ती शिवराम गायकवाड अस ७५ वर्षीय आजोबांचं नाव आहे. आजोबांना काही आजारांनी ग्रासले आहे. त्यांची दृष्टी देखील कमी झाली आहे. अशी माहिती अविरत फाउंडेशनचे निसार सय्यद यांनी दिली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून त्या मुलांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
निवृत्ती शिवराम गायकवाड हे ७५ वर्षाचे आहेत. त्यांचं पुण्यातील आंबेगावात कुटुंब राहतं, ते स्वतः तिथेच कुटूंबासोबत राहत होते. पण, मुलांनी त्यांना आळंदीत बेवारस सोडून दिले आहे. निवृत्ती यांना तीन अपत्य आहेत, यात मुलीचा देखील सहभाग आहे. म्हणतात ना मुलगी बापाला तळहाताच्या फोडा प्रमाणे जपते, इथं मात्र याचा विसर अपत्यांना पडला आहे, का? असा प्रश्न पडतो. आळंदीत दवाखान्याच्या समोर बेवारस पडलेल्या आजोबांना निसार सय्यद यांनी आसरा दिला. त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा ही सर्व माहिती पुढे आली.
ज्या बापाने उभ्या आयुष्यात काबाडकष्ट करून आपल्या मुलांना वाढवलं, शिक्षण दिल. त्याच मुलांनी बेवारस सोडून दिल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. सध्याच्या काळात आई- बाप नकोत अशी प्रथाच पडत चालली आहे. आई- वडील मुलांना नकोशे झाले आहेत. म्हातारे आई- वडील ओझं वाटत आहेत. खर तर या उतार वयात आणि शेवट च्या टप्प्यात आई- वडिलांना मुलांची नितांत गरज असते. आधाराची गरज असते. त्याच वयात आपले आधारवड असलेली मुले अशा पद्धतीने बेवासर सोडून जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
आळंदी मधील अविरत फाउंडेशन संस्था बेवारस व्यक्तींसाठी काम करते. निवृत्ती शिवराम गायकवाड हे आळंदी मधील दवाखान्याच्या समोर आढळल्यानंतर संस्थेकडून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. याबाबत आळंदी पोलिसांना माहिती दिली. मग, मातोश्री वृद्धाश्रमात त्यांना सोडले आहे. अशी माहिती अविरत फाउंडेशन चे निसार सय्यद यांनी दिली. ही संस्था बेवारस व्यक्ती आणि पर्यावरणासाठी काम करते.