अपात्रतेचे कारण पुढे करीत राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील अनेक जागा भरलेल्याच नाहीत. संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२१साठी जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीतून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने केला. तसेच राखीव जागांसाठी पात्रता निकष धोरण रद्द करून, निकालाचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणीही करण्यात आली.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एफटीआयआय प्रशासनासमोर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता अनेक उमेदवारांनी पात्रता गुणांची अट ओबीसी (४५ टक्के), एससी आणि एसटी (४० टक्के), सर्वसाधारण (५० टक्के) उत्तीर्ण केलेली नाही. मात्र हे आकड्यांबाबत पारदर्शकता नाही. तसेच या निकषांच्या वैधतेचाच प्रश्न आहे. या मनमानी नियमांमुळे या श्रेणींमध्ये योग्य उमेदवार मिळत नाहीत म्हणून राखीव जागा सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांद्वारे भरल्या जातील असेही प्रशासन म्हणू शकते. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील नसताना केवळ विशेषाधिकारप्राप्त, सामान्य जागांसाठी इच्छुक असलेले उच्च जातीतील उमेदवारच पात्रता गुण उत्तीर्ण होऊ शकतात हे अत्यंत शंकास्पद आहे. या प्रक्रियेद्वारे, सर्वसाधारण प्रवर्गातील सर्वांसाठी खुल्या ठेवल्या जाणाऱ्या जागा इतर प्रवर्गातील लोकांसाठीही बंद ठेवल्या जातील.

आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे –

संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुलभूत सामाजिक हक्कांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आवाज उठवू नयेत म्हणून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. या संदर्भात एफटीआयआय प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.