पुणे : ‘अमनोरा सिटी कॉर्पोरेशनकडून पुणे पोलीस दलाला नऊ वाहने देण्यात आली आहे. नवीन वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. पुण्यातील वाहतूक प्रश्नांसह महिला सुरक्षा, रस्त्यांवरील गैरप्रकार, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल,’ अशी ग्वाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.

सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (अमनोरा) सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) पुणे शहर पोलीस दलास नऊ चारचाकी वाहने (किया कॅरेन्स) रितसर खरेदी प्रक्रिया राबवून पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली. या वाहनांचा हस्तांतरणाचा सोहळा अमनोरा पार्क टाऊन क्लब येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा)चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द केल्या. आदित्य देशपांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे या वेळी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘पुण्याचा विस्तार वाढत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी सहकार्य केल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढेल, तसेच शहराला शिस्त लागण्यास मदत होईल. नागरिकांनी न घाबरता त्यांच्या तक्रारी पोेलिसांकडे कराव्यात. तक्रारींचा पाठपुरावा करावा. नागरिकांनी ‘११२ ’ क्रमांकावर तक्रारी कराव्यात. रस्त्यावर, पादचारी मार्गांवर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करू.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘अमनोरा’कडून विविध समाजापेयागी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. महिलांचे सबलीकरण, पाणी बचतीचा संदेश, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात कार्य केले जात आहे,’ असे अनिरुद्ध देशपांडे यांनी नमूद केले.स्नेहल जाधव, तहसीन बेग यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. राजकुमार शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.