पुणे : ‘आपल्याकडे सकस साहित्यावर बेतलेले चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरले आहेत,’ असे मत ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी शनिवारी व्यक्त केले. त्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी चित्रपटामध्ये कथेला महत्त्व आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘चित्रपट क्षेत्रात कृष्णधवल काळापासून आताच्या एआयपर्यंत झालेल्या विविध बदलांची मी साक्षीदार आहे. मी आजही चित्रपट पाहते, पण माझ्या दृष्टीने कृष्णधवलचा जमाना हा सुवर्णकाळ होता,’ असे मत पारेख यांनी व्यक्त केले.

पूना गेस्ट हाउस स्नेहमंच, कोहिनूर कट्टा आणि विदिशा विचार मंच यांच्या वतीने रविवारी (१७ ऑगस्ट) कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते ‘कोहिनूर रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्त आशा पारेख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्या बोलत होत्या.

‘आई फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना माझे वडील तिला भेटायला यायचे. त्यांचे आंतरधर्मीय लग्न ही त्या काळातील एक क्रांतिकारी गोष्ट होती. मात्र, माझे आजोबा चित्रपटांना अर्थसाह्य करणारे असल्यामुळे चित्रपटात काम करण्याबद्दल मला घरातून विरोध होण्याचा प्रश्न नव्हता. स्वतःहून चित्रपटात काम करण्याची आलेली संधी मी स्वीकारली. गुरुदत्त, राजेश खन्ना, देव आनंद, शम्मी कपूर यांच्याबरोबर काम करता आले, याचा आनंद आहे. मला अनेक चांगल्या भूमिका करता आल्या, पण तरीही मला ‘मदर इंडिया’ची भूमिका करायला नक्कीच आवडले असते,’ असे पारेख यांनी सांगितले.

मला अनेक चांगल्या भूमिका करता आल्या, पण तरीही मला ‘मदर इंडिया’ची भूमिका करायला नक्कीच आवडले असते. – आशा पारेख, ज्येष्ठ अभिनेत्री

‘मला पुरणपोळी फार आवडते’

आशा पारेख यांचा पुण्याशी असलेला विशेष संबंध आणि जिव्हाळा त्यांनी या गप्पांमध्ये उलगडला. त्या म्हणाल्या, ‘पुण्याविषयी माझ्या मनात खास जागा असून, मी पुण्यात घरदेखील घेणार होते. पण, ते स्वप्न अपूर्णच राहिले. मला पुरणपोळी फार आवडते.’