करोना विषाणूने सध्या संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतामध्येही या विषाणूने दररोज अनेक रुग्ण सापडत आहेत, महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नाशिक यासारखी महत्वाची शहरं करोना विषाणूमुळे बेजार झाली आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. ३१ मे पर्यंत लॉकडाउनचा चौथा टप्पा वाढवण्यात आला आहे. या काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. समाजाच्या अनेक स्तरातून लोकं या कामगार व मजुरांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. पुण्यात रिक्षा चालवणाऱ्या अक्षय कोठावले या तरुणाने आपल्या लग्नासाठी जमवलेली २ लाखांची रक्कम मजूरांच्या जेवणाची सोय करण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

मजुरांना मदत करण्यापर्यंतच अक्षय थांबलेला नाही, आपल्या परिसरातील बुजूर्ग व्यक्ती, गर्भवती महिलांना त्यांच्या दवाखान्यापर्यंत मोफत पोहचवण्याचं कामही अक्षय करतोय. आपल्या मित्रांच्या सहाय्याने लग्नासाठी जमवलेले २ लाख रुपये अक्षयने जेवण बनवण्यासाठी खर्च केले आहेत. जेवणाची पाकीट तयार केल्यानंतर अक्षय रिक्षामधून गावाकडे निघालेल्या मजुरांना वाटायला जातो. दररोज ४०० लोकांच्या जेवणाची जबाबदारी अक्षय आणि त्याच्या मित्रांनी घेतलेली आहे.

“मला लोकांना मदत करायला नेहमी आवडते आणि सध्या संकटकाळात तर हे सर्वांचं कर्तव्य आहे. रिक्षा चालवून मी माझ्या लग्नासाठी २ लाख रुपये जमवले होते. २५ मे ला माझं लग्न होणार होतं, पण सध्याच्या परिस्थितीमुळे लग्न करणं मला आणि माझ्या होणाऱ्या पत्नीला योग्य वाटलं नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र चर्चा करत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मी गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातून आपल्या घरी जाणाऱ्या कामगारांना पाहत होतो. जेवणाअभावी चालत जाताना त्यांचे खरंच हाल होत होते, म्हणून मी आणि माझ्या मित्रांनी त्यांच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे लग्नासाठी जमवलेली रक्कम मी यात घातली, माझ्या मित्रांनीही त्यांना जेवढं शक्य होतं तेवढी मदत केली. यानंतर आम्ही एका जागी जेवण बनवायची सोय करत, दररोज भाजी-पोळीचे डबे तयार करत मजूरांना वाटत आहोत.” अक्षय पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

संगमवाडी, येरवडा, रेल्वे स्टेशन परिसर, मालधक्का चौक या परिसरात मी रिक्षाच्या सहाय्याने कामगारांपर्यंत अन्न पोहचवतो. या कामासाठी अक्षय आणि त्याच्या मित्रांनी जमवलेले पैसे आता हळुहळु संपायला आले आहेत. त्यामुळे अक्षय आणि त्याच्या मित्रांनी भाजी-पोळी ऐवजी पुलाव किंवा सांबार-भात देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कितीही संकट आलं तरीही गरजूंना अन्नदान करण्याचं काम थांबवणार नसल्याचं अक्षयने सांगितलं. पुण्यातील टिंबर मार्केट भागात अक्षय राहतो. याआधीही कोल्हापूर-सांगली पुरादरम्यान अक्षयने अशाच पद्धतीने मदत केली होती.