पुणे : महापालिकेतून वगळून उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आल्याने महापालिका आणि नगरपालिका यांच्यामध्ये मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी हस्तांतरण समिती नेमण्यात आली आहे. पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन व अन्य बाबींची जबाबदारी सध्या महापालिकेकडेच असून नगरपरिषद पर्यायी व्यवस्था करेपर्यंत महापालिकाच हे काम करणार आहे.

महानगरपालिकेच्या हद्दीत उरुळी देवाची, फुरसुंगी यांसह इतर ११ गावांचा समावेश २०१७ मध्ये करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ११ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य सरकारने अचानक ही गावे पालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या गावांचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासनाकडे मनुष्यबळ नसल्याने २३ सप्टेंबर २०२४ ला नगरविकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून या गावांमधील दैनंदिन कामकाज पाहण्याची जबाबदारी महापालिकेकडे दिली आहे.

नगरपरिषद नवीन असल्याने नागरिकांच्या दृष्टीने दैनंदिन मूलभूत सुविधांमध्ये कोणताही खंड पडू नये, यासाठी महापालिकेकडून पूर्वी देण्यात येत असलेल्या सर्व पायाभूत सुविधा नव्याने झालेल्या नगरपरिषदेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुरवाव्यात, असे या आदेशात म्हटले होते. तसेच पायाभूत सुविधा व नागरी सेवा हस्तांतरण करण्यासाठी समितीही नेमण्यात आली होती.

या हस्तांतरण प्रक्रियेची आढावा बैठक नुकतीच पुणे महानगरपालिकेत घेण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या गावांमधील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्तांपैकी बहुतांश मालमत्तांचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या गावांमध्ये पूर्वीही पाणीपुरवठ्यासंदर्भातील कामे महाराष्ट्र जल प्राधिकरणामार्फत केली जात होती. आता प्राधिकरणामार्फत ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असणार आहे. नगरपरिषदेची व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महापालिका पाणीपुरवठ्याची देखभाल दुरुस्ती करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगरपरिषद झालेल्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांतील ‘टीपी स्कीम’ बाबतच्या नोंदींचे हस्तांतरण केले जात आहे. तर नगरपालिका दैनंदिन स्वच्छतेची व्यवस्था करेपर्यंत महापालिकाच या गावांतील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणार आहे. – ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका