पुणे : ‘कोणत्याही देशात अखंड, संघटित समाज असतो, तेव्हा विजय मिळतो. कडव्या देशभक्तीच्या जोरावर विजय मिळविता येतो, हाच आणीबाणीच्या काळातील संदेश आहे. मात्र, अलीकडे संकट किंवा हल्ला झाला, की आपली राष्ट्रभक्ती जागी होते. राष्ट्रभक्ती समुद्राच्या लाटांप्रमाणे भरती-ओहोटी येणार नसावी,’ असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहास हिरेमठ यांनी येथे व्यक्त केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘आणीबाणी काळा दिवस’ याअंतर्गत हिरेमठ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, सत्याग्रही श्रीधरपंत फडके, माजी आमदार जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते. आणीबाणीमध्ये शिक्षा भोगलेल्या ३०० पेक्षा अधिक जणांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला.

‘इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवली, हे न्यायालयात सिद्ध झाले आणि त्यांचे पददेखील धोक्यात आले. त्यामुळे त्यांची सत्ता सोडायची तयारी नसल्याने तशा हालचाली सुरू केल्या. त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागू नये, म्हणून त्यांनी आणीबाणीचा प्रस्ताव आणून तो तातडीने राष्ट्रपतींकडे पाठवून त्याच रात्री मंजूर करून घेतला. त्यानंतर ‘मिसा’ कायद्यानुसार ठिकठिकाणी अटक सत्र सुरू झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. त्या वेळी लोकसंघर्ष समिती स्थापन करून त्या माध्यमातून भूमिगत काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले,’ असे हिरमेठ यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘सत्याग्रहींनी वेगवेगळ्या माध्यमांतून आणीबाणीच्या विरोधात आवाज उठविला. परदेशातील भारतीयांकडेही त्याचा प्रचार केला. संधी मिळेल, तेथे निषेध करण्यात आला. या सत्याग्रहींचा अमानुष छळ पोलिसांनी केला. इंदिरा गांधी यांनी निवडणुकीची घोषणा केल्यानंतर सर्व विरोधक एकत्र आले आणि जनता पक्षाची स्थापना झाली. जनता पक्ष बहुमताने निवडून आला. इंदिरा गांधींसह अनेकांना पराभव स्वीकारावा लागला,’ असे हिरेमठ यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आणीबाणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचारक होते. तेथे त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्या वेळी जे कष्ट स्वयंसेवकांनी केले, त्यामुळेच आपण आजचे वैभव अनुभवत आहोत. त्याचा वापर जनकल्याणासाठीच करायचा आहे,’ असे जावडेकर यांनी सांगितले. धीरज घाटे यांनी प्रास्ताविक केले. तर अनुपमा लिमये यांनी सूत्रसंचालन केले.