पुणे : मॉडेल कॉलनी येथील जैन बोर्डिंग वसतिगृहाच्या जागेवरून शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवीत आहेत. जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहारामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा हात असल्याचा आरोप धंगेकर यांच्याकडून केला जात आहे.केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुती मध्ये असतानाही शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर हे भाजप नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुरावे नसताना खोटे आरोप करत आहेत. महायुतीच्या नेत्यांनी सूचना देऊनही त्यांचे आरोप असेच सुरू आहेत.

या सर्व प्रकारामुळे व्यतीत झालेल्या शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी याला उत्तर दिले आहे. महायुतीचा धर्म म्हणून आम्ही आत्तापर्यंत शांत राहिलो. मात्र यापुढे काळात धंगेकर यांनी बेभान आरोप करणे सुरू ठेवल्यास महायुतीचा धर्म विसरून ‘जशाच तसे उत्तर दिले जाईल’, अशा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर टीका करू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत धंगेकर हे सतत भाजपच्या नेत्यांवर आरोप आणि टीका करत आहेत. महायुतीचा धर्म म्हणून भाजपचे पदाधिकारी प्रत्युत्तर देत नव्हते. मात्र, आता हे खपवून घेतले जाणार नाही.’

‘धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले. त्यानंतर जैन बाेर्डिंग प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री माेहाेळ यांच्यावरही आरोप करत आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन आम्ही करत होतो. मात्र, यापुढील काळात धंगेकर यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘व्यावसायिकांकडून वसुली कोण करते?’

‘धंगेकर यांनी वक्फ बाेर्डाची रविवार पेठेतील जागा कुटुंबीयाच्या नावावर केली आहे. त्यामुळे त्यांना आरोप करण्याचा अधिकार नाही. धंगेकर यांच्यावर खंडणीसारखे गंभीर गुन्हे आहेत. मोहोळ यांच्यावर केलेल्या प्रत्येक आरोपाचे खंडन मोहोळ यांनी केले आहे. रविवार पेठेतील व्यावसायिकांना धंगेकर त्रास देतात. या ठिकाणी बेकायदा बांधकामे करून व्यावसायिकांकडून भाड्याची वसुली कोण करते? याचा शोध भाजपकडून घेतला जाणार आहे, असे गणेश बिडकर यांनी सांगितले.