‘एस. जी. गोखले अॅन्ड कंपनी’
दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसह विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आणि समारंभासाठी मांडव घालण्यात येतात. उपलब्ध जागेत विविध रचनांचे मांडव उभे करणे तसेच त्यांचे सुशोभन करणे, खड्डे विरहित मांडव उभे करणे या कामात एस. जी. गोखले अॅन्ड कंपनीने ठसा उमटवला आहे. गेल्या ८४ वर्षांपासून मांडव उभारणीच्या क्षेत्रात काम करताना काळानुरूप येणारी आव्हाने स्वीकारत कंपनीने आपले क्षेत्र विस्तारले आहे. आज पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात कंपनीची मांडव उभारणीची कामे अव्याहतपणे सुरू असतात.
घरगुती कार्यक्रमासाठी मांडव घालण्यासाठी बोहरी आळीतील एका व्यावसायिकाला सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी काही कारणास्तव त्याने मांडव उभारता येणार नाही, असे सांगितले. तेव्हा हा व्यवसाय पुण्यातील ठराविक लोकांपुरता मर्यादित होता आणि कोणत्याही घरगुती आणि सार्वजनिक कारणास्तव मांडव उभारण्यासाठी काहीजणांवर अवलंबून राहावे लागायचे. एका मर्यादित स्वरूपात असलेला हा व्यवसाय आपणच सुरू केला तर, असा प्रश्न सीतारामभाऊ गोखले यांचे मामा बापूसाहेब रानडे यांना पडला आणि त्यांनी सीतारामभाऊंना तूच हा व्यवसाय सुरू कर असे सांगितले. त्यातून सीतारामभाऊ गोखल्यांनी १९३३ साली एस. जी. गोखले मांडववाले कंपनीची पुण्यात स्थापन केली.
एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटले की, त्यातील बारकावे समजून घ्यावे लागतात. सीतारामभाऊंनी ते आव्हान पेलण्याचे ठरवले आणि मांडवांचे माप, मोजणी आणि उभारणीमधील छोटय़ा-छोटय़ा गोष्टी आधी समजून घेतल्या. त्या काळी लाकडी बांबूंच्या साहाय्यानेच मांडव उभे केले जायचे. त्यानंतर सीतारामभाऊंनीच लाकडी खांब, लोखंडी गर्डर, लोखंडी शिडय़ा यांचा वापर करून अनुभवाने मांडव उभारायला सुरुवात केली आणि काळानुरूप व्यवसायात स्थित्यंतरे होत गेली. १९५२ साली पंडित भीमसेन जोशी यांनी आपले संगीतातील गुरू रामभाऊ कुंदगोळकर यांच्या स्मरणार्थ ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ची सुरुवात पुण्यात केली. पहिल्या वर्षी या महोत्सवासाठी मांडव उभारणीचे काम गोखले मांडव कंपनीला मिळाले आणि तेव्हापासून आजतागायत या महोत्सवातील मांडव उभारणीचे काम गोखले कंपनीकडेच आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यक्रमापासून ते काँग्रेसच्या अनेक अधिवेशनांसाठी गोखले कंपनीनेच मांडव उभे केले आणि या व्यवसायातील एक विश्वासार्ह नाव म्हणून गोखले मांडववाले कंपनी पुढे आली. त्यानंतर गोव्यात पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे कामही गोखले यांच्याकडेच होते. पं. नेहरू पंतप्रधान असताना फग्र्युसन महाविद्यालय आणि रेसकोर्स येथे कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी देखील वेगळ्या प्रकारचा मांडव उभा करण्यात आला होता. अशाच प्रकारे पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठीही मांडवाची मागणी आली आणि कंपनीचे नाव सर्वत्र पोहोचले.
सन १९८६ पासून कंपनीचे काम अमित गोखले पाहात आहेत. अमित यांना व्यवसायाचा वारसा आजोबा सीतारामभाऊ आणि वडील मकरंद यांच्याकडून मिळाला. आता या व्यवसायात त्यांना बंधू आशुतोष हे देखील मदत करतात. सन १९९८ मध्ये पुण्यात पहिल्या कॉन्स्ट्रो या रिअल इस्टेट क्षेत्राचे एक प्रदर्शन भरले होते. त्याकरिता गोखले कंपनीने रचना अभियंता वामनराव कुलकर्णी यांनी बनविलेल्या आराखडय़ातून तब्बल ८० फुटांचे मांडवाचे स्ट्रक्चर विकसित करून उभे केले आणि रस्त्यांवर खड्डे न करताही लोखंडी मांडव उभा करता येतो, याबाबतचा विश्वास कंपनीने सार्थ करून दाखवला. तेथून पुण्यासह राज्यात आणि राज्याबाहेरही अनेक ठिकाणी खड्डे विरहित मांडव उभारण्याकरिता कंपनीला काम मिळत गेले.
पुण्यासह राज्यात आणि गुजरातेतील अहमदाबाद, गोव्यातील पणजीपर्यंत कंपनी विस्तारत गेली. बाहेरील राज्यातून विशेषत: सरकारी कार्यक्रमांसाठी मांडव उभारणीसाठी या कंपनीला जास्त मागणी असते. गोव्यात ‘व्हिजन २०००’ नावाचे एक प्रदर्शन झाले होते. तेथेही कंपनीने तेथील भौगोलिक स्थितीनुसार वेगळ्या रचना आणि पद्धतीचा मांडव उभारला होता. तसेच गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकरिताही दरवर्षी कंपनीला बोलावणे येते. मांडव उभारणीमध्ये अनेक बदल होऊन ती आता एक विकसित पद्धती बनली आहे. आता वातानुकूलित मांडवांची मागणी सर्रास होते. मांडवाला बाजूने प्लायवूडचे नक्षीदार तावदान करून सुमारे साडेआठ टनाचे वातानुकूलित यंत्र (एअर कंडिशन – एसी) बसवले जाते. अर्थातच हे मांडवाच्या क्षेत्रावर अवलंबून असून एसी मागणीनुसार बसवला जातो. चाकण येथील कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. तेव्हा अशा प्रकारचा मांडव उभा केला होता, असे अमित सांगतात.
सद्य:स्थितीत स्ट्रक्चरल आणि पारंपरिक मांडवांनाच जास्त मागणी आहे. जागा कमी असते तेथे पारंपरिक मांडव उभा करण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, स्ट्रक्चरल मांडवामध्ये वजनाने अत्यंत हलके असलेले जर्मन स्ट्रक्चर जास्त प्रसिद्ध आहे. मांडव खासकरून गणेशोत्सवासाठी उभा करताना त्याची उंची वाढवताना जास्त काळजी घेणे आवश्यक असते. मांडवाचे आणि त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या देखाव्यांचे वजन, लांबी, रुंदी, माप अशा सर्व घटकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे रचना अभियंत्याकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. तसेच त्याने बनविलेल्या आराखडय़ानुसारच मांडव तयार करणे योग्य असल्याचे मत अमित व्यक्त करतात. कंपनीने आजमितीस भारतात कोठेही मंडप उभारणीचे काम करण्याची क्षमता निर्माण केली आहे. या कामात अमित यांना त्यांचे बंधू आशुतोष यांचेही सहकार्य लाभत आहे. व्यवसायात नवीन प्रयोगही चालू आहेत. लोखंडी स्ट्रक्चर्स ही वजनाने अधिक असल्याने त्यांची ने-आण, उभारणी यावर मर्यादा येतात. त्यामुळे अमित सध्या वजनाने हलक्या धातूच्या स्ट्रक्चरवर काम करत आहेत.