पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून चाेरट्यांनी चार लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर भागातील साडेसतरा नळी परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी चार लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.
एनडीए परिसरातील खडकवाडी गावातील एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन हजार रुपये लांबविले. याबाबत एकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एनडीए-खडकवासला रस्त्यावरील खडकवाडी गावात राहायला आहेत. शुक्रवारी (२७ जून) तरुण, त्याचे आई-वडील घरात झोपले होते. चोरट्याने खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. कपाटातील दोन हजार रुपयांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार शेलार तपास करत आहेत.