पुणे : ‘रेषा बोलक्या असतात. त्या समाज घडवतात. या रेषांमध्ये सामाजिक आंदोलन उभे करण्याची ताकद असते,’ असे मत ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांनी सोमवारी व्यक्त केले.

जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आयोजित व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख यांच्या ‘बोलक्या रेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पालव यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ शिल्प-चित्रकार प्रमोद कांबळे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे, प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया या वेळी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ व्यंगचित्रकार विनय चानेकर यांना ‘व्यंगरेषा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पालव यांच्या हस्ते देशमुख यांच्या ‘इलस्ट्रेशन रेफरन्स बुक’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वाटप या वेळी करण्यात आले.

‘व्यंगचित्रांचे प्रदर्शन ५, ६ आणि ७ मे या दिवशी बघण्यासाठी खुले असेल. तसेच ६ मे रोजी विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यंगचित्रकारांशी संवाद साधता येणार आहे,’ असे देशमुख यांनी सांगितले. भूषण वानखडे यांनी सूत्रसंचालन केले.