पुणे : दरवर्षी पावसाळ्यात लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. दूषित पाणी आणि अन्नामुळे ही मुले आजारी पडतात. यंदा मे महिन्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तेव्हापासून जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये जास्त वाढ होऊ लागली आहे. सध्या अतिसार, आमांश, कावीळ आणि विषमज्वराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

पावसाळ्यात पिण्याचे पाणी दूषित झाल्याने जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. यात अतिसार, कावीळ, आमांश या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माश्या बसून ते दूषित होतात. असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाबाच्या तक्रारी वाढतात. सध्या लहान मुलांमध्ये या आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लहान मुलांना बाहेरील खाद्यपदार्थ देणे टाळावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा यांनी दिला.

दूषित पाणी अथवा अन्नामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. एकट्या पुण्यात या महिन्यात तीव्र अतिसाराचे ५७८ रुग्ण आढळले असून, आमांश २९, कावीळ ९ आणि विषमज्वराचे १६ रुग्ण आढळले आहेत. यंदा शहरात जानेवारी ते १२ सप्टेंबर या कालावधीत जलजन्य आजारांचे एकूण ७ हजार ७७५ रुग्ण आढळले असून, त्यात सर्वाधिक ७ हजार ३४७ रुग्ण तीव्र अतिसाराचे आढळले आहेत. त्याच वेळी आमांशाचे १५०, कावीळ १०१, विषमज्वराचे १६५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या वर्षी कॉलराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली.

काळजी काय घ्यावी?

  • महापालिकेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा.
  • शुद्धीकरण न केलेले, कूपनलिका, विहीर वा कालव्याचे पाणी पिऊ नये.
  • शिळे अथवा माश्या बसलेले अन्न खाऊ नये.
  • जेवणापूर्वी आणि शौचाहून आल्यानंतर हात साबण आणि पाण्याने धुवावेत.
  • पाणी गाळून व वीस मिनिटे उकळून व नंतर थंड करून प्यावे.
  • पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करून, कोरडे व स्वच्छ करावेत.
  • इमारतीतील पाण्याच्या टाकीची नियमितपणे सफाई करावी.

डासांमुळे पसरणाऱ्या आजारातही वाढ

पावसाळ्यामुळे पुण्यात डासांमुळे पसरणाऱ्या साथरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे प्रामुख्याने रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. पुण्यात सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे २८५ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील २ रुग्ण डेंग्यूचे निदान झालेले आहेत. या वर्षभरात आतापर्यंत डेंग्यूचे संशयित रुग्ण १ हजार ६६९ आढळले आहेत. त्यातील ८३ रुग्ण डेंग्यूचे निदान झालेले आहेत. शहरात चिकुनगुनियानेही डोके वर काढले आहे. या महिन्यात चिकुनगुनियाचे ८ रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षभरात चिकुनगुनियाच्या २० रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर या महिन्यात हिवतापाचे २ रुग्ण सापडले आहेत. या वर्षभरातील हिवतापाची रुग्णसंख्या ३ आहे. शहरात डासांमुळे पसरणाऱ्या या आजारांमुळे या वर्षभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

दंडात्मक कारवाईवर भर

डासांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळणारे घरमालक अथवा व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. या वर्षभरात २ हजार ५७१ जणांना नोटिसा बजावून ४ लाख ६६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.