पुणे : अंधार दूर करून दिवाळीचा सण उजळून टाकणाऱ्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. दीपोत्सवासाठी विविध आकाराच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत पणत्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत नसल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले आहे. नागरिकांचा इलेक्ट्रॉनिक कंदील, बल्ब खरेदीकडे वाढत असलेला कल आणि यंदा पावसाचा फटका बसल्याने बाजारात पणत्यांची खरेदी कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दीपोत्सवात पणत्यांना वेगळेच महत्त्व असते. पणत्यांशिवाय दिवाळी साजरा होत नाही, अशी भावना सहज व्यक्त केली जाते. मात्र, बदलणारे जीवनमान आणि बाजारात वाढणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि बल्ब यांच्यासमोर पणत्यांचा उजेड तितका प्रभावी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत बाजारातील पणत्यांची विक्री कमी होत असल्याचे कुंभारवाड्यातील विक्रेते सांगतात.
त्यासंदर्भात ‘श्री मटका भंडार’चे नवनाथ शिर्के म्हणाले,‘यंदा अचानक पडलेल्या पावसाने विक्री मंदावली आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे पणत्यांच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.’
‘यंदा पणत्यांच्या दरात थोडी घट झाली आहे. सुमारे ३० ते १०० रुपये डझन या प्रमाणे पणत्यांची विक्री होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पणत्यांच्या विक्रीला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, विविध आकारांच्या आकर्षक नक्षीकाम असलेल्या पणत्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. तुळशीच्या आकाराच्या, वाड्याच्या शैलीतील, प्राण्यांच्या आकृत्यांतील, मंदिराच्या आकाराच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. बाजारात या पणत्यांना मोठी मागणी आहे.
दीपोत्सवात पणत्यांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा पावसाचा फटका बसल्याने पणत्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत नागरिकांकडून पणत्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. नवनाथ शिर्के, श्री मटका भंडार, पणत्या विक्रेते