पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांसह महत्त्वाच्या चौकांमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब, फीडर-पिलर काढण्यासाठी महापालिका आणि महावितरण यांची संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. शहरातील प्रमुख ३२ रस्त्यांवर हाेणाऱ्या वाहतूक काेंडीची कारणे शोधण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही दिवसांपूर्वी पथ विभागाची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर दोनशेपेक्षा अधिक कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली.

त्यावेळी वाहतूक कोंडीसाठी अनेक घटक जबाबदार असल्याचे समोर आले. त्यानंतर गेल्या आठवड्यात महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्यात बैठक झाली. त्यावेळी शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाहतुकीची कोंडी होत असलेल्या रस्त्यांसह महत्त्वाच्या चौकांबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी यांच्या मध्ये देखील नुकतीच एक बैठक झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या बैठकीची माहिती दिली.

अधिक माहिती देताना अतिरिक्त आयुक्त दिवटे म्हणाले, ‘महापालिकेने केलेल्या पाहणीत काही चाैकांत, तसेच पदपथांवर महावितरणचे विजेचे खांब, फिडर-पिलर यांचा अडथळा असल्याचे आढळून आले हाेते. हे अडथळे दूर करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. वाहतुकीला अडथळा ठरणारे हे विजेचे खांब, तसेच फिडर- पिलर काढण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करणे आणि उपाययाेजना करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.’ या समितीमध्ये निर्णय झाल्यानंतर पुढील पावले उचलली जाणार आहे.

‘महावितरण कंपनीच्या माहितीनुसार शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या पदपथांवर सुमारे ७० हजार खांब आहेत. ते बाजूला करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. वाहतुकीला अडथळा ठरणारे हे खांब स्थलांतरित करण्यासाठी जागांची आवश्यकता आहे. या जागा शाेधण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती हे काम करील,’ असे त्यांनी सांगितले.