पुणे : साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सेल्फी पॉइंटजवळ झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याने रांगेत असलेल्या पुढील वाहनांना धडक देण्यास सुरूवात केली. जवळपास छोट्या मोठ्या मिळून १० ते १२ वाहनांना कंटेनरने उडवल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनरच्या धडकेत मोटार चेपली गेल्यामुळे त्यातील प्रवाशांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान, कंटेनरसह इतर वाहनांतील मिळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतूक पोलिसांनी दोन तासांसाठी बंद ठेवली होती.
कंटेनर चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे आग लागली होती. चालकांसह प्रवासी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीची आरडाओरडा करीत होते. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे कुणालाच त्यांच्या मदतीसाठी पुढे जाता येत नव्हते. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या ठिकाणी अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलीस, स्थानिक नागरिकांसह तरूणांकडून जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच परिसरातील वाहतूक वळविल्यामुळे कोंडी सोडविण्यासाठी तरूणांनी वाहतूक अमलदारांसोबत काम केले.
फेब्रुवारी २०२४ मध्ये घडला होता मोठा अपघात
भरधाव टँकर चालकाने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना १० फेबुवारी २०२४ रोजी नवले पुलावर घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नव्हते. नवले पूल, भूमकर पूल परिसरात यापूर्वी गंभीर स्वरुपाचे अपघात झाले आहेत. नवले पूल परिसरात एकापाठोपाठ झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेऊन वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिकेने एकत्र येऊन या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पुलावर तीव्र उतार आहे. उतारावर मालवाहू वाहनांचे ब्रेक निकामी होऊन अपघात घडतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नवले पुलावर असा घडला अपघात
नवले पुलावर अपघात होऊन तीन वाहनांनी पेट घेतल्याची वर्दी गुरुवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार सिंहगड, नवले, कात्रज, एरंडवणा टँकर, मुख्यालयातील रेस्क्यू व्हॅन, पीएमआरडीए रेस्क्यु व्हॅन आणि दोन फायरगाडी अशी आठ अग्निशमन वाहने रवाना झाली. घटनास्थळी दोन कंटेनर आणि त्यामध्ये चारचाकी वाहन अडकल्याने पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. परंतु, दुर्देवाने घटनेत कंटेनरमधून दोन पुरुष आणि मोटारीमधील दोन पुरुष, दोन महिला व मुलगी असे एकूण सात जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
मोठ्या कंटेनर चालकाने आग लागण्याआधी अनेक वाहनांना धडक दिली होती. त्यामध्येही अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकारी, ४० जवान घटनास्थळी कार्यरत होते.
