पुणे : ‘माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकरने आयुष कोमकरचा खून केला. आंदेकरने अन्य आरोपींशी संगनमत करून कट रचला. या खून प्रकरणातील आरोपींचे वय १९ ते २५ वर्षे आहे. गुन्हेगारी कृत्यात तरुणांचा वापर करणे, तसेच त्यांना सामील करून घेण्यात बंडू आंदेकर तरबेज आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे’, अशी माहिती पाेलिसांनी साेमवारी न्यायालयात दिली.
आयुष कोमकरचा खून विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने नाना पेठेत केला. आयुष बंडू आंदेकरचा नातू आहे. आंदेकरचा मुलगा वनराज याच्या खून प्रकरणात आयुषचे वडील गणेश कोमकर आरोपी आहे. कोमकर खून प्रकरणात आंदेकरसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, १२ जणांना अटक करण्यात आली आहे. आंदेकरचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज हा पसार आहे. आरोपींच्या पोलस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.
आयुष कोमकरवर गोळ्या झाडणारे आरोपी पठाण आणि मेरगु यांनी अंगावरील कपडे, जॅकेट फेकून दिले आहे. तपास करायचा आहे. आरोपींच्या मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करायचे आहे. आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने एकत्रित तपास करायचा आहे. या प्रकरणातील पसार आरोपी कृष्णा आंदेकर याचा शोध घ्यायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास पठारे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. मनोज माने, ॲड. प्रशांत पवार, ॲड. अमित थोरात यांनी बाजू मांडली.
बंडू आंदेकरचे पोलिसांवर आरोप
‘पसार आरोपी कृष्णा आंदेकर याची माहिती न दिल्यास त्याला चकमकीत ठार मारू’, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप बंडू आंदेकर याने सोमवारी न्यायालयात केला. कोमकर खून प्रकरणातील अन्य आरोपींना पोलीस कोठडीत बेदम मारहाण झाल्याच्या आरोप केला. या प्रकरणातील आरोपी सुजल मेरगू याने मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी त्याच्याकडे मारहाणीबाबत विचारणा केली. त्याला अंगावरील वळ दाखविण्यास सांगितले. त्यानंतर न्यायालयाने नाराजी व्यक्त करून आरोपींना आवश्यक त्या वस्तू पुरविण्याची सूचना तपास अधिकाऱ्यांना केली. आंदेकरने केलेले आरोप तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांनी फेटाळून लावले.