पुणे : हडपसरमधील मांजरी भागात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. दोन गटांतील वादातून कोयता आणि देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन पाठलाग करताना प्रतिस्पर्धी टोळीतील एकावर गोळीबार करताना नेम चुकला. गोळीबारात एक तरुण जखमी झाला. मावसभावाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वैभव श्रवण गवळी (वय २०, रा. हडपसर ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव गवळी याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुष्पा कुचेकर (वय ४०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुमीत खवळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा कुचेकर यांचा मुलगा स्वप्नील उर्फ बिट्ट्या आणि सुमीत खवळे यांच्यात वाद आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सुमीत खवळे, त्याचा मावसभाऊ वैभव गवळी आणि साथीदारांनी कुचेकर याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरून खवळे, गवळी आणि साथीदार कुचेकरचा पाठलाग करत होते. खवळे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते, तसेच साथीदारांकडे कोयते होते. दुचाकीस्वार कुचेकर याच्यावर खवळे याने पिस्तुलातून गोळी झाडली. नेम चुकल्याने गोळी गवळी याच्या खांद्याला चाटून गेली. गोळीबारात गवळी जखमी झाला. दरम्यान, दुचाकीस्वार कुचेकर हा भरधाव वेगात तेथून पसार झाला.