पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या अहिल्यानगरमधील तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने पकडले. नगर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. तरुणाकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा १४ किलो गांजा, मोबाइल संच, मोटार असा सहा लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

योगेश रामभाऊ साळवे (वय २५, रा. सोनाई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. साळवेविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथक नगर रस्त्यावर गस्त घालत होते. त्या वेळी आगानगर सोसायटी रस्त्यावर योगेश साळवे मोटारीत थांबला होता. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने साळवेला सापळा लावून पकडले. मोटारीतील पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी १४ किलो गांज्यासह मोटार, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस कर्मचारी विशाल दळवी, सचिन माळवे, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, स्वप्नील मिसाळ यांनी ही कामगिरी केली.