पुणे: औषधविक्री दुकानाची खिडकी उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ६४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिराजवळ दीप काॅर्पोरेशन हे औषध विक्रीचे दुकान आहे. सोमवारी पहाटे चोरट्यांनी दुकानाची खिडकी उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली ६४ हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, हवालदार गोंजारी तपास करत आहेत.
पुण्यात सराइताकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला कोंढवा पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त करण्यात आली.
शेख अहमद ऊर्फ बबलू सूरज सय्यद (वय १९, रा. आदर्श चाळ, अप्पर इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. कोंढवा परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी बबलू सय्यद हा एका सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून बबलूला पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीच्या पिस्तुलासह तीन काडतुसे सापडली. त्याने पिस्तूल कोणाकडून आणले, तसेच कशासाठी बाळगले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जाधव, सहायक निरीक्षक राकेश जाधव, विशाल मेमाणे, नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतीश चव्हाण, लक्ष्मण होळकर, सुजीत मदने, संतोष बनसुडे यांनी ही कामगिरी केली.
किरकोळ वादातून पुण्यातील मोटारचालकाला मारहाण
किरकोळ वादातून रिक्षाचालकाने मोटारचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.आरिफ अजीज शाह (वय २५, रा. राजीव गांधीनगर, खडकी) असे जखमी झालेल्या मोटारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सोनू पटेल, वसीम तन्वीर खान (दोघे रा. खडकी बाजार) यांना अटक करण्यात आली. याबाबत शाह याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारचालक आरिफ रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खडकी बाजार परिसरातून निघाला होता. व्हिलिक्स सिनेमाजवळ रिक्षाचालक सोनू पटेल आणि साथीदार तेथून निघाले होते. मोटारचालक आरिफने त्यांच्याकडे बघितले. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपी पटेलने रिक्षात ठेवलेला गज काढला. मोटारचालक आरिफ याला पटेल आणि साथीदारांनी गजाने बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करत आहेत.