पुण्यात म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील माळीण गावात ही घटना घडली. या घटनेमुळे माळीण गावात एकच खळबळ उडाली आहे. अजय अनुराग साठे (४०) असं मृत व्यक्तीचं नाव असून बापू लक्ष्मण जोरी (२४) असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजय अनुराग साठे आणि आरोपी बापू लक्ष्मण जोरी यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यावरून अनेक वेळा त्यांच्यात भांडणं देखील झाली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास अजय साठे म्हशीला पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होते. याचवेळी आरोपी बापूसोबत त्यांचा वाद झाला.

आणखी वाचा- पुणे : गे जोडीदाराचं ठरलं लग्न… वेगळं होण्याच्या भीतीतून केली जोडीदाराचीच हत्या

वाद इतका वाढला की, आरोपी बापू याने घरी जाऊन छर्‍याची बंदूक आणली आणि अजयवर गोळी झाडली. गोळी लागल्याने अजय साठे जागीच कोसळले. अजय साठे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून आरोपी बापूने घटनास्थळावरुन पळ काढला. अजय साठे यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आरोपी बापूला काही वेळात ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.