पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत पाऊस सुरू झाला आहे. मात्र, अद्याप धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. चारही धरणात मिळून ५.६७ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात किंचित घट झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये मिळून ५.८१ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. टेमघर धरणात ०.२४ टीएमसी, वरसगाव धरणात २.७०, पानशेतमध्ये १.९२, तर खडकवासला धरणात ०.८१ टीएमसी असा मिळून एकूण ६.६७ टीएमसी एवढा पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

गेल्या दोन दिवसांत टेमघरमध्ये १९ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १८ मिलिमीटर पावसाची तर, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या क्षेत्रात अनुक्रमे १६ आणि १४ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली असला तरी, पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये किंचित कमी पाणीसाठा आहे, अशी माहितीही जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये मिळून ५.८१ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला, तरी ओढ्यातून येणारा येवा अद्याप धरणात आलेला नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार काही दिवस कायम राहिल्यानंतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.