पुणे : शहरात पाऊस सुरू होऊन आठ दिवस झाल्यानंतरही धोकादायक झाडांच्या फांद्यांच्या छाटणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, २२९ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. शहरात आतापर्यंत झाडांच्या फांद्या कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मोठ्या झाडांखालून जाताना नागरिकांमध्ये भीतीचे सावट असल्याचे चित्र आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्त्यांवर, तसेच खासगी सोसायट्यांमधील झाडांच्या धोकादायक फांद्या, धोकादायक अवस्थेतील झाडे महापालिकेकडून तोडली जातात. मात्र, पाऊस सुरू होऊन आठ दिवस झाल्यानंतरही महापालिकेकडून अद्याप या संदर्भातील तक्रारींचा पूर्ण निपटारा करण्यात आलेला नाही. धोकादायक झाडे, तसेच त्यांच्या फांद्या तोडण्यासाठी महापालिकेकडे एक हजार ६११ तक्रारी आल्या होत्या. त्यांपैकी एक हजार ३८२ तक्रारींची दखल घेण्यात आली. मात्र, अद्यापही २२९ तक्रारींवर महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही.

तीन दिवसांपूर्वी कर्वेनगर परिसरात झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. बुधवारीही पेशवे उद्यानाजवळ झाड कोसळून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या घटनांमुळे रस्त्यावरील धोकादायक झाडे आणि फांद्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात रस्त्याकडेला सार्वजनिक जागेत असलेली, तसेच सोसायट्यांनी त्यांच्या हद्दीत लावलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या पडून अपघात घडतात. पावसाळ्यापूर्वीची कामे करताना महापालिकेचा उद्यान विभाग अशी झाडे वा फांद्या तोडते. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांकडे एप्रिल महिन्यात खासगी आणि पालिकेच्या मालकीच्या जागेतील झाडे आणि झाडांच्या फांद्याबाबत १६११ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी पुणे महापालिकेने १३८२ तक्रारींवर कारवाई केली.

शहरातील झाडांच्या धोकादायक बनलेल्या फांद्या तोडण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार द्यावी लागते. मात्र, उद्यान विभागाकडून नागरिकांच्या तक्रारींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, असे काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. क्षेत्रीय कार्यालयातूनदेखील याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे समोर आले आहे. ‘झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याची निविदा संपली असून, आम्ही परवानगी देतो; तुम्ही तुमच्या पातळीवर फांद्या तोडून घ्या,’ असा सल्लाही महापालिकेकडून दिला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

मे महिन्यात २५४ फांद्या आणि झाडपडीच्या घटना

‘पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या. मे महिन्यात आतापर्यंत २५४ फांद्या आणि झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत ३२४ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. यापुढील काळातही धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील रस्त्यांवरील झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडण्याच्या सूचना उद्यान विभागाला देण्यात आल्या आहेत. खासगी सोसायटीमधील झाडांच्या फांद्या पदपथावर येत असतील आणि त्याचा नागरिकांना त्रास होत असेल, तर कोणत्याही तक्रारीची, तसेच अर्जाची वाट न पाहता या फांद्या तोडणे आवश्यक आहे.- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त