वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या पुण्याबरोबरच बाहेरगावच्या सामाजिक संस्थांचे कार्य माहिती करून घेता यावी आणि सामाजिक संस्थांना मदत व्हावी, या उद्देशाने गेली २१ वर्षे ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदा हे प्रदर्शन उद्या, शुक्रवारपासून रविवारपर्यंत (१२ ते १४ सप्टेंबर) निवारा सभागृहात भरत आहे. या निमित्ताने प्रदर्शनाची आयोजक संस्था ‘आर्टिस्ट्री’च्या वीणा गोखले यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाची संकल्पना काय आहे?
विविध प्रकारच्या सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्याची ओळख या प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजाला होते. या निमित्ताने दानशूरांना दान करण्याची संधी तर मिळतेच, त्याचबरोबर नव्या दानशूरांना ‘देण्या’चा आनंद मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. दिलीप आणि माझ्या संकल्पनेबरोबरच अथक प्रयत्नातून सुरू झालेला हा दानयज्ञ २००५ पासून अविरत सुरू आहे.
सुरुवातीला पुण्यापुरता मर्यादित असलेला हा उपक्रम काही वर्षांनी मुंबईतदेखील सुरू करण्यात आला आणि तोही सुरू आहे. सामाजिक संस्थांना त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जशी या प्रदर्शनाची मदत होते, तसेच ज्यांच्याकडे वेळ आहे आणि काही सामाजिक कार्य करायचे आहे, ती मंडळीदेखील या निमित्ताने या संस्थांशी जोडली जातात. आपली कितीही इच्छा असली, तरी काही वेळा वैयक्तिक पातळीवर एखादे सामाजिक कार्य एकट्याला करता येत नाही. अशा वेळी तशा प्रकारचे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून ते कार्य तडीस जाऊ शकते, असे सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तींसाठीदेखील सामाजिक संस्थांची होणारी ओळख महत्त्वाची ठरते.
संस्था या प्रदर्शनात कशा प्रकारे सहभागी होतात?
आजपर्यंत जवळपास २८५ सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि अंदाजे १८ कोटींपेक्षा जास्त निधीची भरीव मदत सेवाभावी संस्थांना मिळाली. या प्रदर्शनाद्वारे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी सहभागी संस्थांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. तसेच, या सर्व संस्था निवडताना त्यांना मी स्वतः भेट देते. या भेटीतून संस्थांची निवड पारखून केली जाते, जेणेकरून योग्य प्रकारे कार्य करणारी संस्थाच समाजापर्यंत पोहोचेल आणि त्या संस्थांना मदत होईल. हे प्रदर्शन जरी वर्षातून एकदाच असले, तरी याची तयारी वर्षभर सुरू असते.
विविध संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासाठी प्रवासाच्या वेळेसह संस्थेच्या अभ्यासासाठी आवश्यक वेळ दिला जातो. हा उपक्रम म्हणजे एक व्रत असल्याच्या भावनेतून अत्यंत पारदर्शकपणे सुरू असल्यामुळे तो बाविसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.
उद्यापासून सुरू होणाऱ्या या वेळच्या प्रदर्शनातील सहभागींविषयी काय सांगाल?
उद्यापासून रविवारपर्यंत नवी पेठेतील निवारा सभागृहात सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या सकाळी ११ वाजता पद्मश्री डाॅ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डाॅ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. या वर्षी या उपक्रमात बीड, बुलडाणा, जळगाव, अकोला, मेळघाट, पुणे, जालना, सातारा, कोल्हापूर, अमरावती, इंदापूर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असणाऱ्या संस्था सहभागी होत आहेत. अनेकविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या समाजसेवी संस्थांचे कार्य मुळातूनच समजून घेण्यासारखे आहे.
कुणी शैक्षणिक क्षेत्रात, कुणी वंचित घटकातील मुलांच्या संगोपनात, कुणी पशु-पक्ष्यांची सेवा करण्यात, कुणी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनात, महिला सबलीकरणात, कुणी फासेपारधी मुलांच्या शिक्षण आणि पालन पोषणात, कुणी ग्राम विकासात, तर कुणी शेतीविषयक प्रकल्पांत कार्य करतात. वेगवेळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या, प्रामुख्याने ग्रामीण, निमशहरी भागातल्या २४ सेवाभावी संस्थांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडले जाणार आहे.
प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांसाठी जसे प्रवेशशुल्क नसते, तसेच हे प्रदर्शन पाहण्यासाठीही कोणतेही प्रवेशशुल्क आकारले जात नाही. देगणी द्यायलाच हवी, अशी सक्तीही नाही. सामाजिक संस्थाच नाही, तर त्यात कार्य करणाऱ्या माणसांच्या भावना जाणून घेण्यासाठी संधी म्हणून या प्रदर्शनाकडे पाहावे, इतकेच मला वाटते.
श्रीराम ओक | shriram.oak@expressindia.com