मागील दोन वर्षे करोना साथरोगाच्या काळात काहीसे मागे पडलेले डेंग्यू आणि स्वाइन फ्लू आता डोके वर काढत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमध्ये करोनामुळे नव्हे, तर डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमुळे रुग्ण दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

करोना विषाणू संसर्गाने सर्वत्र थैमान घातल्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये पुणे शहरातून डेंग्यू आणि स्वाइन फ्लू जवळजवळ नाहीसे झाल्याचे चित्र दिसून आले. यंदा करोनाने काहीशी उसंत घेतल्यानंतर मात्र या दोन्ही कीटकजन्य आजारांनी पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने चढता होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर स्वाइन फ्लूच्या सहव्याधीग्रस्त रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल होण्याची गरज भासत आहे. डेंग्यूमध्येही प्लेटलेट गंभीर प्रमाणात कमी झालेल्या रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता विभागात ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा : पुणे : वानवडीत बनावट पनीरची विक्री करणाऱ्या उत्पादकावर छापा ; एफडीएची कारवाई

संजीवन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मुकुंद पेनुरकर म्हणाले,की डेंग्यू आणि स्वाइन फ्लू या दोन्ही आजारांमुळे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. स्वाइन फ्लूचा संसर्ग असल्यास पहिल्या ४८ तासात टॅमिफ्लू हे औषध दिल्यास आजाराची तीव्रता रोखणे शक्य होते. त्यामुळे रुग्णांनी ताप अंगावर काढणे अजिबात योग्य नाही. लवकरात लवकर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्यावा, जेणेकरून उपचारांना विलंब झाल्यामुळे होणारी गुंतागुंत टाळणे शक्य होईल. खूप ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळणे अशी लक्षणे, थकवा असल्यास डेंग्यूची शक्यता नाकारता येत नाही. सहव्याधीग्रस्त रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षता विभागात ठेवण्यात येत असल्याचे डॉ. पेनूरकर यांनी स्पष्ट केले.

पिंपरी : अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ पिंपरीत रहिवाशांचे आंदोलन

लहान मुलांमध्येही डेंग्यू, स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांमधील विषाणूजन्य आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी केले आहे. डॉ. जोग म्हणाले,की डेंग्यूच्या संसर्गामध्ये मुलांना जास्त ताप येतो, मात्र सर्दी- खोकला नसतो. थकवाही खूप येतो. डेंग्यूमध्ये मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण राखले जाणे आवश्यक आहे. शक्य असल्यास मुखपट्टीचा वापर करण्याचा सल्लाही डॉ. जोग यांच्याकडून देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या प्रकियेला सुरुवात

खबरदारी आवश्यकच

  • ताप, सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास या लक्षणांकडे दुर्लक्ष नको.
  • तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
  • घर आणि परिसरात डासांची पैदास रोखणे आवश्यक.
  • स्वत:च्या मनाने औषधोपचार टाळा.
  • लहान मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे, मुखपट्टी वापरण्यास द्या.