भाजपच्या झंझावातात काँग्रेसची वाताहत झाली असतानाही पुणे शहरात तग धरून असलेली काँग्रेस जिल्ह्यात एकाकी लढत देत होती. इंदापूर, भोर आणि पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघांत ती अस्तित्व टिकवून होती. मात्र, भाजपने हळूहळू एकेक मोहरा टिपल्याने आता जिल्ह्यात काँग्रेस हतबल झाली आहे. इंदापूरमधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पहिल्यांदा काँग्रेसला राम राम केला. त्यानंतर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपच्या वळचणीला गेले. पुरंदरचा किल्ला भाजपला सर करता येत नव्हता. अखेर माजी आमदार संजय जगताप हे भाजपवासी झाल्याने काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार झाल्यासारखेच आहे. जगताप हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे जिल्ह्यात त्यांचा वारस नेमण्यासाठी नेत्याची शोधाशोध करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

पुणे शहरात काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे थोडेफार अस्तित्व दिसत होते. आता तेदेखील शिवसेना (शिंदे) पक्षात गेल्याने शहरातील काँग्रेस एकाकी पडली आहे. पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यात अद्याप या पक्षाला यश आले नसल्याने पूर्णवेळ शहराध्यक्षही नेमता आलेला नाही. हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी लवकरच पक्षांतर्गत बदल करण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही हा पक्ष शहराध्यक्ष कोणाला नेमायचे, यातच अडकल्याचे चित्र आहे. एकीकडे शहरात ही अवस्था असताना माजी आमदार थोपटे आणि जगताप यांच्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची धगधग सुरू होती. थोपटे यांच्यानंतर जगताप यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता जिल्ह्यातून काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. धाक दाखवून भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते घेत असल्याचा दावा त्यांनी केला. वास्तविक विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी साथ न दिल्याने जगताप नाराज होते. त्यांची नाराजी दिसून आली होती. त्यावर काँग्रेसने कृती करण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही. हीच बाब माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याही बाबतीत झाली. ते दुसऱ्यांदा कसब्यातून निवडणूक लढवित असताना काँग्रेसचे काही पदाधिकारी अंतर राखून होते. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केल्यावर त्यांना रोखण्यासाठी पक्षाने फारसे प्रयत्न केल्याचे दिसले नाही. त्यांना अवघी ५५२ मते मिळाली, ही बाब निराळी! मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली, याचा प्रचार भाजपने केला. त्याचा फटका धंगेकर यांना बसला. व्यवहारे यांना पक्षातून काढून टाकण्याची कारवाई काँग्रेसने केली. आता व्यवहारे यांना काँग्रेसने पुन्हा पक्षात घेतले, तर धंगेकर हे पक्ष सोडून गेले.

जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेसला नवीन जिल्हाध्यक्ष शोधावा लागणार आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी काँग्रेसचा आमदार नाही. जिल्ह्यात संपर्क असलेला नेता शिल्लक राहिलेला नाही. यापूर्वी जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारे हर्षवर्धन पाटील, जगताप आणि थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पाटील हे काँग्रेसकडून भाजपकडे आणि भाजपकडून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आहेत. जगताप आणि थोपटे भाजपवासी झाल्याने जिल्ह्याचे नेतृत्व करणारा नेताच काँग्रेसकडे राहिलेला नाही आणि अन्य पक्षांतून काँग्रेसकडे येण्यासाठी कोणी इच्छुकही नसल्याचे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गट आणि गणांचा आराखडा जाहीर झाला आहे. त्यावर हरकती आणि सूचना घेण्याचे काम सुरू झाले आहे. या परिस्थितीत काँग्रेसला जिल्हाध्यक्ष नसल्याने कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचे, असा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडणार आहे. एके काळी काँग्रेसचा जिल्ह्यात दबदबा होता. जगताप यांच्या माध्यमातून पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची पाळेमुळे भक्कम होती. जगताप यांच्या ताब्यात या मतदारसंघातील नगर परिषद, पंचायत समिती, काही ग्रामपंचायती यांबरोबरच सहकारी सोसायट्या होत्या. आता त्या ठिकाणी भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे काँग्रेसला वाली राहिला नसून, जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. पुणे शहरात ही स्थिती व्हायची नसेल, तर काँग्रेसला पुण्यात पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमून, गटतट विसरून समेट घडवून आणावे लागणार आहेत. sujit.tambade@expressindia.com