पिंपरी : मद्यपानासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी चाकूचा धाक दाखवून भंगार व्यावसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार दिघीत घडला. याप्रकरणी व्यावसायिकाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संग्रामसिंग गजलसिंग भादा (रा. दिघी) याला अटक केली असून, त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे भंगार मालाचे दुकान आहे. आरोपींनी मद्यपानासाठी ५०० रुपये मागितले. त्यांनी नकार दिल्याने त्यांना धमकी देण्यात आली.

लूटमार प्रकरणी तिघांना अटक

ताथवडे परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका ट्रकचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.शैलेश विकास सरोदे (वय २०, बोपोडी), आशिष संतोष सोजवळ ( वय २६, बोपोडी), साहील सलीम शेख (रा. खडकी बाजार) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बंडू मुकिंदा शेळके ( वय ४३, रा. हिंगणा, नागपूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास शेळके हे त्यांच्या ट्रकमध्ये ताथवडे येथे झोपले होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. त्यांनी ट्रकमध्ये झोपलेल्या शेळके यांना जबरदस्तीने खाली उतरवले. दमदाटी, शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच कोयत्याचा धाक दाखवून खिशातून दोन हजार शंभर रुपये जबरदस्तीने काढून घेतले.