पुणे : मधुमेह हा सहसा लठ्ठपणाशी जोडला जातो. परंतु, अनेक मधुमेही हे लठ्ठ नसतात, हे निरीक्षण गेल्या ७५ वर्षांत वारंवार नोंदविले गेले आहे. सामान्य वजनाच्या आणि सडपातळ व्यक्तींनाही मधुमेहाची बाधा होते. याचे वर्णन आधी कुपोषणाशी निगडित मधुमेह असे करण्यात येत होते. आता त्याला टाईप ५ मधुमेह हे नाव देण्यात आले आहे. पुण्यातील डॉक्टरांनी या मधुमेहाबाबत केलेले संशोधन लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.
पुण्यातील केईएम हॉस्पिटलमधील मधुमेह उपचार केंद्राचे प्रमुख डॉ. चित्तरंजन याज्ञिक हे या शोधनिबंधाच्या लेखकांपैकी एक आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये वेल्लोर येथे विविध देशांमधून आलेल्या तज्ज्ञांची बैठक झाली. टाईप १ आणि टाईप २ या सामान्यपणे आढळणाऱ्या मधुमेह प्रकारांशिवाय दुर्मीळ आनुवंशिक आणि इतर दुय्यम मधुमेह प्रकारांपासून कुपोषणाशी निगडित मधुमेहाची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याचे टाईप ५ मधुमेह असे नामकरण करण्यात आले. यावर सर्व तज्ज्ञांनी संमती दिली. याचा मूळ उद्देश कुपोषणाशी निगडित मधुमेहाकडे लक्ष वेधून त्यातील पुढील संशोधनाला चालना देणे हा होता.
याबाबत डॉ. चित्तरंजन याज्ञिक म्हणाले की, मधुमेह टाईप २ हा अतिपोषणाशी जोडला जातो. परंतु गेल्या ७५ वर्षांत अनेक मधुमेही हे अतिपोषित अथवा लठ्ठ नसल्याची वारंवार नोंद करण्यात आली आहे. विशेष करून विकसनशील देशांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. या मधुमेहाची बाधा असलेले रुग्ण सामान्य वजनाचे, कमी वजनाचे आणि सडपातळ असतात. याआधी त्याचे वर्णन कुपोषणाशी निगडित मधुमेह असे करण्यात आले होते. हे वर्णन प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशांच्या बाबतीत होते. त्यामध्ये आफ्रिका, जमैका, भारत यांसारख्या अनेक शतके गरीब आणि आता विकसनशील देशांचा समावेश आहे.
आणखी संशोधनांची आवश्यकता
लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधामध्ये टाईप ५ मधुमेहाची वैशिष्ट्ये परिभाषित करून या संकल्पनेचा सारांश देण्यात आला आहे. व्यापकपणे विचार करता हे रुग्ण सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित लोकसंख्येतील आहेत. त्यांच्यामध्ये कमी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), इन्शुलिनची कमतरता आणि रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे. परंतु, त्यांच्यात टाईप १ मधुमेहींसारखे किटोॲसिडॉसिस म्हणजेच तीव्र इन्शुलिन कमतरता विकसित होत नाही. विशिष्ट चाचण्या केल्यावर ते इन्शुलिन संवेदनशील असल्याचे आढळते. मधुमेहाला कारणीभूत कुठलेही प्रमुख आनुवंशिक उत्परिवर्तन त्यांच्यात दिसून येत नाही आणि स्वादुपिंडाला नुकसान झाल्याचे आढळून येत नाही. त्यामुळे या उपप्रकाराचे आनुवंशिक घटक परिभाषित करण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक असल्याचे शोधनिबंधात अधोरेखित करण्यात आले आहे.
टाईप ५ मधुमेह ही केवळ नवीन ओळख नसून पुढील कृतीसाठी एक निर्णायक दिशा ठरणार आहे. टाईप २ मधुमेहींना आपण कमी खायला आणि जास्त चालायला सांगतो. मात्र टाईप ५ मधुमेही हे आधीच कमी खातात आणि कठोर परिश्रम करतात. त्यामुळे टाईप ५ मधुमेह हा संशोधनाच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. – डॉ. चित्तरंजन याज्ञिक, ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ
