पुणे : उद्योग क्षेत्राकडून प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राला देणग्या दिल्या जातात. मात्र, वंचित घटकांना फारशी मदत केली जात नाही. ही दरी भरून काढण्यासाठी आम्ही बलात्कार पीडित, मूकबधीर आणि समाजातील वंचित मुलांसाठी मदत करीत आहोत, असे प्रतिपादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी सोमवारी केले. गरीब देशांना एक कप चहाच्या किमतीत सीरमने लस उपलब्ध करून दिल्याने कोट्यवधी मुलांच्या जीव वाचू शकला, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
‘शताब्दी केंद्र’ येथे भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड या शाळेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन डॉ. पूनावाला यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या शाळेत मूकबधिर मुलांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. विलू पूनावाला फाउंडेशन या संस्थेने शाळेच्या स्थापनेपासून पाठबळ दिले आहे.
यावेळी डॉ. सायरस पूनावाला म्हणाले की, विलू पूनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक घटकांना मदत करीत आहोत. इतर उद्योगपतींकडून मदत होत नसलेल्या वंचित घटकांना मदत करण्याच आम्हाला अधिक रस आहे. बलात्कार पीडित, मूकबधिर वंचित मुले त्यांना मोठ्या उद्योगांकडून पाठबळ मिळत नाही. आम्ही भारतीय मूकबधीर क्रिकेट संघालाही आर्थिक पाठबळ दिले. या संघाने दुबई, टोबॅगो, मॉरिशस आणि ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. रेड क्रॉस सोसायटीच्या शाळेला यापुढेही मदत केली जाणार आहे. या शाळेच्या देखभालीसाठी सिरमकडून वार्षिक मदत केली जाईल.
अनेक मोठ्या देणगीदार संस्था, उद्योगसंस्था अशा प्रकारच्या वंचित घटकांना मदत करीत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात निधीची कमतरता आहे. ही कमतरला भरू काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्योगसंस्था प्रामुख्याने शिक्षण क्षेत्राला देणगी देतात. वंचित घटकांच्या कल्याणासाठी निधी मिळत नसल्याने आमच्याकडून त्यांना प्राधान्य दिले जात आहे, असेही डॉ. पूनावाला यांनी स्पष्ट केले.
यावेळी भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विक्रम फाटक, उपाध्यक्ष माब्रीन नानावटी, मानद सचिव प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी व शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.