पुणे : शहरातील पाणी साचणाऱ्या २०१ ठिकाणांची यादी तयार करून तेथे पाणी साचू नये, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असतानाच शहरात या वर्षी पडलेल्या पहिल्याच पावसात पाणी साचणारी २९ नवीन ठिकाणे सापडली आहेत. यामध्ये सर्वाधिक ठिकाणे ही झोन २ मधील असून यामध्ये औंध, बाणेर, शिवाजीनगर, कोथरूड या भागांचा समावेश आहे. त्यामुळे आता जुन्या ठिकाणांसह या नवीन ठिकाणांवर आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
शहरात दर वर्षी पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती गोळा करून त्याची यादी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केली आहे. पावसाचे पाणी साचणाऱ्या २०१ ठिकाणांचा यात समावेश आहे. येथे पाणी साठणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी २०१ पैकी ११७ ठिकाणांवर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला होता. उर्वरित ८४ ठिकाणी कामे सुरू असून, ३८ ठिकाणी कामे पूर्ण केली जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले होते.
शहरात झालेल्या पहिल्याच पावसात अनेक भागांतील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले. वाहने बंद पडण्याचे प्रकारही घडले. त्याचा मनस्ताप नागरिकांना झाला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून पाणी साठलेल्या ठिकाणी आवश्यक ती उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
या वर्षी झालेल्या पहिल्या पावसात पाणी साचणारी २९ नवी ठिकाणे आढळली. यामध्ये सर्वाधिक भाग हे झोन २ मधील आहेत. तर झोन-५ मध्ये पाणी साचणारे एकही नवीन ठिकाण आढळले नाही. या ठिकाणी पाणी कशामुळे साचले, याचा अभ्यास महापालिकेने सुरू केला आहे. तेथे पुन्हा पाणी साचणार नाही, यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.- गणेश सोनुने, उपायुक्त, आपत्ती व्यवस्थापन, पुणे महापालिका