पुणे : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ब्रेमेन चौकातील विद्युत रोहित्राला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली.
विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे (वय २७, रा. पौड रस्ता, कोथरूड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. नेमकी दुर्घटना कशी झाली, यादृष्टीने महावितरण, तसेच पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिली. पोलिसांनी माहितीनुसार, विनोद आणि सौरभ हे मित्र आहेत.
ओैंधमधील ब्रेमेन चौकात महावितरणाचा रोहित्र आहे. रोहित्राजवळ पडीक जागा आहे. या जागेचा वापर कोणी करत नाहीत. रविवारी रात्री दोघे जण विद्युत रोहित्राजवळील पडीक जागेत थांबले होते. त्यावेळी रोहित्रातून उतरलेल्या विद्युत प्रवाहाला त्यांचा स्पर्श झाला.
विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला.सोमवारी सकाळी दोन तरुण रोहित्राजवळ असलेल्या पडीक जागेत मृतावस्थेत पडल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेची महावितरण आणि पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली. महावितरणच्या तंत्रज्ञांनी दिेलेल्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.