पुणे : महावितणच्या जास्त ग्राहकसंख्या असलेल्या शाखांचे विभाजन करण्यात येणार असल्याने, पुण्यात आठ नव्या शाखांची निर्मिती होणार आहे. तसेच कोंढव्यामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘महावितरण’च्या कोंढवा शाखेत अपुरे मनुष्यबळ आणि ग्राहकांच्या मोठ्या संख्येमुळे वीज यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळे परिसरातील सुमारे ८० हजार वीज ग्राहकांना वारंवार खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोंढवा शाखेचे विभाजन करून कोंढवा खुर्द, शिवनेरीनगर, कोंढवा बुद्रुक आणि येवलेवाडी या नव्या शाखा सुरू करण्याची मागणी हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार चेतन तुपे यांनी सोमवारी विधानसभेत केली.
वीजयंत्रणेतील त्रुटींमुळे होणारे अपघात, जीवितहानी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडेही त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. ‘कोंढवा परिसरात अरुंद गल्ल्या आहेत. त्यातून विद्युत तारा गेल्यामुळे सातत्याने अपघात होतात. या परिसरात भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करावा. पावसाळ्यात या भागात पाणी साचते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या वर्षी महिला आणि लहान मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे,’ असे आमदार तुपे म्हणाले.
‘महावितरण’च्या रास्ता पेठ विभागाच्या सेंट मेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या कोंढवा शाखेत सुमारे ८१ हजार ग्राहकांचा समावेश होतो. या शाखेतील कामकाजासाठी २९ कर्मचारी मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात २५ कर्मचारीच काम करतात. तीच परिस्थिती शेजारील शाखांचीही आहे. ‘एनआयबीएम’ शाखेत २६ हजार ७०० ग्राहक, तर २३ कर्मचाऱ्यांऐवजी २० कर्मचारी, मुल्लानगर शाखेत १८ हजार ग्राहक, तर २५ कर्मचाऱ्यांऐवजी १८ कर्मचारी कामकाज सांभाळतात.
महावितरणच्या नियमांनुसार २० हजार ग्राहकसंख्या असलेल्या भागाला एक शाखा कार्यालय देण्यात येते. मात्र, शहरातील अनेक भागांत ग्राहकांची संख्या अधिक असूनही शाखांचे विभाजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे वीजयंत्रणेवर ताण येत असून, नागरिकांची गैरसौय होत आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाखांचे नव्याने सर्वेक्षण करावे’ असे आमदार तुपे यांनी नमूद केले.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री, उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महावितणच्या जास्त ग्राहकसंख्या असलेल्या शाखांचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यातून पुण्यात आठ नव्या शाखांची निर्मिती होणार आहे. हडपसरमधील शाखेचे विभाजन करून गंगा व्हिलेज शाखा यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या धोरणांनुसार देयकात १ पैसा, २ पैसा अशी वाढ करून महानगरांमध्ये भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे निर्माण करण्याची योजना आहे. त्यानुसार कोंढव्यासारख्या अडचणीच्या भागात ही योजना राबविण्यात येणार आहे.’
‘येवलेवाडी ही नवी शाखा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, इतर शाखांबाबत पडताळणी करून निर्णय घेण्यात येणार आहे. वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नवीन प्रस्तावित शाखा
कोंढवा शाखेचे विभाजन करून येवलेवाडी, धायरी शाखेतून नऱ्हे, किरकटवाडी शाखेतून नांदेड सिटी, मांजरी शाखेतून शेवाळवाडी, देहूरोड शाखेमधून रावेत, मुंढवा शाखेच्या विभाजनातून मगरपट्टा आणि मोशी शाखेच्या विभाजनातून बोऱ्हाडेवाडी ही शाखा नव्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.