पुण्यातील तरुणाचे ‘कडक स्पेशल भारतीय जलपान’ दालन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅकेनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन मनासारखी नोकरी न मिळाल्याने खचून न जाता अजित केरुरे या तरुणाने कडक स्पेशल हे चहाचे दालन सुरू केले आहे. समाजमाध्यमातून या दालनाची बरीच चर्चा होऊन फ्रँचायझीसाठी त्याला विचारणा होत असून, येत्या काही काळात राज्यभरात २५ दालने सुरू करण्याची त्याची योजना आहे.

मूळचा लातूरचा असलेल्या अजितने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर नोकरीसाठी धडपड केली. मात्र, दहा-पंधरा हजारापेक्षा अधिक पगाराची नोकरीच मिळेना.. मग विपणनाच्या दोन नोकऱ्या केल्या. त्यातही मन रमेना म्हणून नोकरीला रामराम ठोकून स्वतचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सदाशिव पेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालयाजवळ दीड महिन्यापूर्वी त्याने दालन सुरू केले. पुणेरी पाटय़ांच्या जोडीला दालनात ‘मॅकेनिकल इंजिनीअरिंगची पदवी लग्न जमवण्यासाठीच उपयोगी पडली’ अशी उपरोधिक पाटी लावण्याची त्याची कल्पना समाजमाध्यमांत चांगलीच पसरली. आज त्याच्या दालनात चहा, कॉफी, दुधाचे एकूण १० प्रकार आहेत. त्याशिवाय सरबतेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पाहा या भन्नाट दुकानाचे फोटो येथे क्लिक करून…

‘आमच्या घरी सगळे उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ असल्याने व्यवसायाची पाश्र्वभूमी नाही. शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बराच वेळ घालवल्यानंतर चहाचा व्यवसाय करण्याचे निश्चित केले. स्वतला चहा आवडतो यासह चहा ही प्रत्येकाची गरज आहे, हे त्यामागील कारण होते. चहाचे दालन सुरू करण्याच्या माझ्या कल्पनेला पत्नीने पूर्ण पाठिंबा दिला. अनेकांशी बोलल्यावर चहाची चव आणि किंमत हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे जाणवले. अल्पावधीत मिळत असलेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.

अभियांत्रिकी शिक्षणाचा उपयोग झालाच

चहाच्या व्यवसायात पाऊल टाकताना अजितने दालन कसे असावे, चहाची किंमत किती असावी, चहा पावडर कोणती वापरावी या सगळ्याचा पूर्ण अभ्यास केला. चहा करण्याचे शास्त्र समजून घेतले. चहाची चव निश्चित करण्यासाठी जवळपास ३७५ लिटर दूध वाया गेले. नोकरीसाठी अभियांत्रिकी पदवी कामी आली नसली, तरी व्यवसाय सुरू करताना शिक्षणातील विश्लेषणात्मक कौशल्याचा उपयोग झाल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत नोकरी शोधणाऱ्या अजितकडे आज बारा जण काम करतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune engineering student started tea stall
First published on: 08-08-2018 at 01:41 IST