पुणे : जंगली महाराज रस्त्यावर आठवड्यापूर्वी भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्हे शाखेला याप्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले असून, वडिलांनीच बांधकाम व्यावसायिक मुलाचा कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून खून करण्याची सुपारी गुंडांना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांसह सहाजणांना अटक केली.

याप्रकरणी वडील दिनेशचंद्र उर्फ बाळासाहेब शंकरराव अरगडे-पाटील (वय ६४, रा. भोसलेनगर), प्रशांत विलास घाडगे (वय ३८, रा. वारजे), अशोक लक्ष्मण ठोंबरे (वय ४८, रा. एरंडवणे), प्रवीण उर्फ पऱ्या तुकाराम कुडले (वय ३१, रा. सुतारदरा, कोथरुड), योगेश दामोदर जाधव (वय ३९), चेतन अरुण पोकळे (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत धीरज दिनेशचंद्र अरगडे-पाटील (वय ३८,रा. खडकी) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स इमारतीजवळ १६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे-पाटील यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिस्तुलातून गोळी न सुटल्याने धीरज बचावले.

हेही वाचा – ‘डॉ. कोल्हे जरा विकासाचेही बोला…’, शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा टोला

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. धीरज अरगडे यांचे निकटवर्तीय आणि कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. धीरज आणि त्यांचे वडील दिनेशचंद्र यांच्यात कौटुंबिक कारणावरुन, तसेच मालमत्तेवरुन वाद झाले होते. वादातून त्यांनी बांधकाम व्यावसायिक मुलगा धीरज यांना जीवे मारण्यासाठी गुंडांना ७५ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून धीरज यांचे वडील दिनेशचंद्र यांच्यासह सहाजणांना अटक केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, रंगराव पवार, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक रमेश तापकीर, अण्णा माने, निलेश साबळे, अनिकेत बाबर, आदींनी ही कारवाई केली.

बांधकाम व्यावसायिकावर दोन वेळा हल्ला

बांधकाम व्यावसायिक धीरज अरगडे यांच्यावर १० मार्च रोजी आरोपींनी चाकूने वार केले होते. त्यावेळी ते बचावले होते. आरोपी कुडले आणि पोकळे यांनी धीरज यांचा मृत्यू झाल्याचे सांगून अरगडे यांच्या वडिलांकडून २० लाख रुपये घेतले होते. या हल्ल्यातून धीरज बचावल्याचे समजल्यानंतर धीरजच्या वडिलांचा आरोपी कुडले आणि पोकळे यांच्याशी वाद झाला होता. दैव बलवत्तर होते म्हणून धीरज हल्ल्यातून बचावले होते.

हेही वाचा – पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीपीएस यंत्रणेद्वारे पाळत

धीरज अरगडे यांच्याकडे माेटार आहे. आरोपींनी अरगडे यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्या नकळत मोटारीत जीपीएस यंत्रणा बसविली होती. १६ एप्रिल रोजी अरगडे मोटारीतून जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयात आले. याबाबतची माहिती आरोपींना समजली. त्यानंतर आरोपींनी तेथे पाळत ठेवली. ते कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर पिस्तूल रोखून गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला.

हल्ल्यामागे कौटुंबिक कलह

धीरज यांचा घटस्फोट झाला होता. ते एका तरुणीबरोबर विवाह न करता राहत होते. वडिलांना ही गोष्ट खटकली होती. कौटुंबिक कलह आणि संपत्तीच्या वादातून वडिलांनी धीरज यांचा खून करण्यासाठी गुंडांना ७५ लाखांची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले.