पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. १६५ नगरसेवकांसाठीच्या ४१ प्रभागांच्या प्रारूप रचनेवर आलेल्या पाच हजार ९२२ हरकतींपैकी १ हजार ३२९ हरकतींची पूर्णतः आणि ६९ हरकती अंशतः दखल घेत १२ प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रभागांच्या नावांना हरकत घेण्यात आल्याने आठ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक १८ वानवडी- साळुंके विहार या प्रभागातील शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी- मुंढवा या प्रभागाला जोडण्यात आला आहे. प्रारूप रचनेमध्ये शिंदे वस्तीच्या रस्त्याने विभाजन झाले होते. प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी- मुंढवा येथील मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडी याला जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक २० बिबवेवाडी- महेश सोसायटी या प्रभागातील के. के. मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर-आंबेगाव- कात्रज या पाच सदस्य असलेल्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुक-आंबेगावचा काही भाग देखील प्रभाग क्रमांक ३८ ला जोडण्यात आला आहे. कोळेवाडी, जांभूळवाडी हा भाग देखील याच प्रभागाला जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक ३८ ला इतर प्रभागांतील काही भाग जोडल्याने हा प्रभाग अधिक मोठा झाला होता. त्यामुळे बालाजीनगर-आंबेगाव- कात्रजमधील सुखसागरनगरचा भाग कमी करून तो अंतिम प्रभागाच्या रचनेत प्रभाग ३९ अप्पर सुपर – इंदिरानगरला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरा नळीमधील थिटे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक ४ खराडी – वाघोलीला जोडला आहे. या प्रभागातून सर्वाधिक हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. सुनावणीसाठी या प्रभागातील नागरिकांनी उपस्थिती लावून थिटे वस्ती वगळण्याची भूमिका मांडली होती.
नाव बदल झालेले प्रभाग (कंसात जुने नाव)
प्रभाग क्रमांक १ – कळस-धानोरी- लोहगाव उर्वरित (कळस – धानोरी).
प्रभाग क्रमांक १४ – कोरेगाव पार्क- घोरपडी- मुंढवा (कोरेगाव पार्क- मुंढवा)
प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरा नळी (मांजरी बुद्रुक- साडेसतरा नळी)
प्रभाग क्रमांक १७ – रामटेकडी-माळवाडी- वैदुवाडी (रामटेकडी- माळवाडी)
प्रभाग क्रमांक २० – शंकर महाराज मठ – बिबवेवाडी (बिबवेवाडी – महेश सोसायटी)
प्रभाग क्रमांक २४ – कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल – के.ई .एम. हॉस्पिटल (कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ)
प्रभाग क्रमांक २६ – घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी (गुरुवार पेठ – घोरपडे पेठ)
प्रभाग क्रमांक ३८ – बालाजी नगर-आंबेगाव -कात्रज (आंबेगाव – कात्रज)
रचनेत बदल झालेले प्रभाग
प्रभाग क्रमांक १, ४, १४, १५, १७, १८, २०, २४, २७, ३४, ३८ आणि ३९ मध्ये बदल झाले आहेत. मध्यवर्ती पेठांमधील प्रभागांमध्ये बदल करण्यासाठी नागरिकांनी सूचना आणि हरकती नोंदविल्या होत्या. त्या अमान्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
४,५२४ हरकती फेटाळल्या
महापालिकेच्या १६५ नगरसेवकांसाठीच्या ४१ प्रभागाच्या प्रारूप रचनेवर पाच हजार ९२२ हरकती, सूचना आल्या होत्या. यापैकी ४ हजार ५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या. १ हजार ३२९ हरकती, सूचना पूर्णतः आणि ६९ हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या.