शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रती खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

रस्त्याचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराकडे देखभाल दुरुस्तीचे दायित्व असते. त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली जाते. या कालमर्यादेत रस्त्यांची दुरवस्था झाली किंवा रस्त्यांवर खड्डे पडले तर त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र महापालिकेने ठेकेदारांवर कारवाई न करता खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. यात देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या काही रस्त्यांचा समावेश होता. त्यावरून महापालिका प्रशासनावर टीका झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११ रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे –

महापालिकेच्या पथ विभागाने दायित्व असलेल्या १२० रस्त्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम त्रयस्थ संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या ४५ रस्त्यांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ११ रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आढळल्याने रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदारांना नोटिस बजाविण्यात आल्या. आता त्यांच्याकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.