पुणे : सदनिकेच्या खिडकीतून तोल गेल्यानंतर लोखंडी जाळीला धरून थांबलेल्या चार वर्षांच्या बालिकेचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानाने वाचविले. कात्रज भागातील खोपडेनगर परिसरात ही घडली. याच भागात राहणारे अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्वरीत तेथे धाव घेऊन खिडकीच्या जाळीला धरून थांबलेल्या बालिकेचे प्राण वाचविले. चव्हाण यांनी केलेल्या कामगिरीचे परिसरातील नागरिकांनी कौतूक केले आहे.

कात्रजमधील गुजरवाडी-निंबाळकरवाडी भागात सोनवणे बिल्डींग आहे. या इमारतीतील आकाश चांदणे कुटुंबीय राहायला आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास चांदणे यांची पत्नी मोठ्या मुलाला शाळेत सोडायला गेली होती. त्या वेळी सदनिकेत चांदणे यांची चार वर्षांची मुलगी भाविका एकटी होती. बाहेर पडताना भाविकाच्या आईने सदनिकेच्या दरवाज्याला कुलूप लावले होते.

अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण याच भागात राहायला आहेत. सकाळी नऊच्या सुमारास चव्हाण यांच्या सदनिकेच्या शेजारी राहणारे उमेश सुतार यांनी समोरील इमारतीच्या सदनिकेतील खिडकीच्या जाळीला घट्ट धरून एक लहान मुलगी थांबल्याचे पाहिले. ती अधांतरी लटकत होती. सुतार यांनी आरडओरडा करण्यास सुरुवात केली. शेजारी राहणारे जवान योगेश चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. चव्हाण यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते घरी होते. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. ते सदनिकेतून थेट पळत बाहेर पडले आणि समोरच्या बाजूस असलेल्या सोनवणे बिल्डींगमध्ये गेले.

सदनिकेजवळ ते पोहोचले. तेव्हा सदनिकेच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. तेवढ्यात भाविकाची आई मुलीला शाळेत सोडून सदनिकेच्या दरवाज्यात आली. चव्हाण यांनी त्यांना तातडीने दरवाजा उघडण्यास सांगितले. भाविकाच्या आईने दरवाजा उघडला. चव्हाण थेट पळत खिडकीच्या दिशेने गेले. खिडकीच्या जाळीला घट्ट धरून थांबलेल्या भाविकाला त्यांनी मदतीचा हात दिला. तिला खिडकीतून ओढून सदनिकेत आणले. ही घटना उघडकीस आल्यानंतर भाविकाची आई घाबरली होती. भाविकाही रडत होती. चव्हाण यांनी दोघींना धीर दिला.

प्रसंगावधानाचे कौतुक

अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण यांची मंगळवारी साप्ताहिक सुटी होती. सदनिकेच्या खिडकीतून पडणाऱ्या चार वर्षांच्या बालिकेचे त्यांनी प्राण वाचविल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. चांदणे कुटुंबीयानी चव्हाण यांचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार वर्षांच्या बालिकेचा जीव वाचविला, याचे समाधान मोठे आहे. वेळेत मदत पोहोचली नसती तर बालिका खिडकीतून तोल जाऊन पडली असती. तिने खिडकीची जाळी घट्ट धरून ठेवली होती. पालकांनी शक्यतो मुलांना घरात एकटे सोडून जाऊ नये. – योगेश चव्हाण, जवान, अग्निशमन दल