देशातील शैक्षणिक राजधानी म्हणून नावाजलेले पुणे नोकरीच्या संधी निर्माण करण्यात मात्र देशात सहाव्या स्थानावर आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत पुण्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. या कालावधीत देशात निर्माण झालेल्या नोकरीच्या एकूण संधींमधील साधारण सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचे द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडिया (असोचम) या संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार तीन महिन्यात देशात साडे आठ लाख संधी निर्माण झाल्या होत्या.
उत्तमोत्तम शिक्षण संस्थांमधून पुण्यात तयार होणाऱ्या मनुष्यबळाला नोकरीसाठी बाहेरच जावे लागत असल्याचे दिसत आहे. देशातील नोकरीच्या संधी निर्माण करणाऱ्या शहरांमध्ये पुणे सहाव्या स्थानावर आहे. असोचमकडून जानेवारी ते मार्च या कालावधीत देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये निर्माण झालेल्या नोकरीच्या संधींचा अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला. पुण्यासह दिल्ली, बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता या शहरांमधील पाहणी करण्यात आली. पुण्यात ४९ हजार २०७ नोकऱ्या उपलब्ध होत्या. देशात उपलब्ध असलेल्या एकूण संधींपैकी अवघ्या ५.८ टक्के संधी या पुण्यात असल्याचे दिसून आले. या आठ शहरांमध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ८.५ लाख नोकरीच्या संधी निर्माण झाल्या होत्या. त्यामधील सर्वाधिक म्हणजे अडीच लाख संधी या दिल्लीमध्ये होत्या. या अभ्यासानुसार अहमदाबादमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजार ५०० संधी असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणानुसार मुंबई तिसऱ्या स्थानावर असून साधारण दीड लाख संधी असल्याचे दिसून आले. दिल्ली, बंगळुरू, मुंबई याबरोबरच चेन्नई आणि हैदराबाद ही शहरे पुण्यापेक्षा आघाडीवर आहेत.
कोणत्या क्षेत्रात किती संधी निर्माण झाल्या याचाही अभ्यास करण्यात आला. एकूण नोकऱ्यांपेकी ६० टक्के संधी या माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाला पूरक असणाऱ्या क्षेत्रात होत्या. त्या खालोखाल सेवाक्षेत्रात संधी असल्याचे दिसून आले. पुण्यातही सर्वाधिक म्हणजे ३२ हजार १७४ संधी या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होत्या. देशातील एकूण संधीच्या तुलनेत हे प्रमाण ६.२ टक्के आहे.

क्षेत्रानुसार पुण्यात निर्माण झालेल्या संधी
माहिती तंत्रज्ञान ३२ हजार १७४
सेवा ६ हजार ३९०
निर्मिती ४ हजार ५४७
बँकिंग आणि वित्तीय सेवा ३ हजार ५८७
बांधकाम १ हजार ९५६
इतर ५५३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरे आणि नोकरीच्या संधी
दिल्ली – २ लाख ५६ हजार ९२६
बंगळुरू – १ लाख ९९ हजार १४५
मुंबई – १ लाख ५८ हजार ५५४
चेन्नई – ८२ हजार २५७
हैदराबाद – ६० हजार ४५५
पुणे – ४९ हजार २०७
कोलकाता – २५ हजार २५१
अहमदाबाद – २० हजार ५४१