पुणे शहरातील नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा खून होऊन वर्ष होत नाही तोवर त्या खून प्रकरणातील गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा आंदेकर टोळीतील दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी १३ आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले. ही घटना ताजी असतानाच कोथरूड भागात बुधवारी रात्री निलेश घायवळ टोळीतील चार जणांकडून दुचाकीवरून जाणार्या प्रकाश मधुकर धुमाळ याच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली.
प्रकाश धुमाळवर मुसा शेख, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयूर कुंभारे या चौघांनी गोळीबार केला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघेजण निलेश घायवळ टोळीतील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमध्ये प्रकाश धुमाळ याला तीन गोळ्या लागल्या असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा मूळचा परभणी येथील असून तो एका कंपनीमध्ये काम करतो. तो मित्रासोबत जेवणासाठी गेला होता. जेवण करून मित्राला घरी सोडण्यास जात होता. त्यावेळी प्रकाश धुमाळवर चौघांनी गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी दाखल होऊन प्रकाश धुमाळ याला रुग्णालयात दाखल केले. आरोपीच्या शोधासाठी विविध भागात पथके पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.