पुणे : हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्याने सराईतांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री येरवडा भागात घडली. या घटनेत विकी राजू चंडालिया ( रा. जय जवान नगर येरवडा ) जखमी झाला असून सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आकाश सतीश चंडालिया, अक्षय सतीश चंडालिया, अमन सतीश चंडालिया, अभिषेक शाम चंडालिया ( सर्वजण रा. रेंजहिल्स,पुणे ), सुशांत प्रकाश कांबळे( रा. पर्णकुटी सोसायटी येरवडा ), संदेश संतोष जाधव, संकेत तारू (दोघे रा. जय जवान नगर येरवडा ) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराचे नेमके कारण समजू शकलेले नाही. वैयक्तिक वादातून गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींवर पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस हद्दीत गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अग्रसेन हायस्कूलसमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये काही सराईत गुन्हेगार शिरले होते. हॉटेल चालक विकी चंडालिया याला त्यांनी पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आकाश चंडालिया यांनी त्याच्याकडील पिस्तूल काढून विकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. गोळीबार करून आरोपी पसर झाले. या घटनेची माहिती मिळतात येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील दिली.

हेही वाचा – पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात

या प्रकरणी काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अग्रसेन हायस्कूल समोरील या हॉटेलबाबत यापूर्वी नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या. या परिसरात लुटमार तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल, पान टपरी व इतर अवैध व्यवसायामुळे शहरात गंभीर गुन्ह्यांसह गोळीबारासारख्या घटना घडत आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बेकायदा हॉटेलवर पोलीस तसेच महापालिका प्रशासन यांनी कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.