पुणे : कर्जबाजारी झाल्यामुळे फळविक्रेत्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रोजी मांजरी खुर्द परिसरात घडली. आत्महत्यापुर्वी संबंधित तरूणाने मोबाइलमध्ये व्हाईस रेकॉर्ड करून मी खूप कर्जबाजारी झालो आहे, पैशांची ताणाताण सुरू असल्याचे नमूद केले. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खून करीत स्वतः गळफास घेतला. 

उज्ज्वला नागनाथ वारूळे (वय ४० रा. मांजरी खुर्द, समर्थ डेव्हलपर्स मांजरी ता. हवेली ) असे खून झालेल्या महिलेचे तर, नागनाथ वसंत वारूळे (वय ४२ रा मांजरी खुर्द, दोघेही मूळ रा. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार वैजनाथ केदार यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या        

माहितीनुसार, वारूळे कुटुंबीय मूळचे तुळजापूरमधील असून, काही महिन्यांपासून मांजरी खुर्द परिसरात कामाला आले होते. कामधंदा मिळत नसल्यामुळे दोघांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान, नागनाथवर कर्ज झाल्यामुळे तो तणावग्रस्त झाला होता. त्याच ताणातून त्याने स्वतःच्या मोबाइलमध्ये व्हाइस रेकॉर्ड केला. माझ्यावर कर्ज खूप झाले, पैशांची ताणताणी झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्याने रेकॉर्डमध्ये नमूद केले. त्यानंतर त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. स्वतः बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

दरम्यान, सकाळच्या सुमारास परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकजण दोरीला लटकत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वाघोली पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करीत आहेत.