पुणे : ऐंशीच्या दशकातील गोष्ट. संगणकाच्या एका क्लिकवर जगभरातील माहिती मिळायला अवकाश होता. मात्र, देशाच्या विकासात मैलाचा टप्पा ठरणारे अनेक बदल पुण्यातील गणेशोत्सवात टिपले जात होते. आता सांगितले, तर खरे वाटणार नाही; पण नातूवाडा मित्रमंडळाने केवळ छायाचित्रे पाहून उरणचे जवाहरलाल नेहरू पोर्ट (तत्कालीन न्हावा शेवा बंदर) साकारले होते. त्याची दखल थेट बंदर बनवणाऱ्या जपानी कंपनीच्या शिष्टमंडळाने घेऊन मंडळाला भेट दिली आणि कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
सन १९८९ मध्ये नातूवाडा मंडळाने जवाहरलाल नेहरू पोर्टची प्रतिकृती साकारली. मंडळाचे अध्यक्ष दिलीप भोकटे सांगतात, ‘मंडळाने विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारलेले देखावे लोकांसमोर आणायचे ठरवले होते. त्या वेळी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या हस्ते उरणच्या न्हावा शेवा बंदराचे उद्घाटन झाले. देशाच्या विकासात हा महत्वाचा टप्पा होता. उद्घाटनाच्या बातम्या, छायाचित्रे बघून बंदराची प्रतिकृती साकारायची, असे ठरवले. कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र करत हा देखावा साकारला. त्यासाठी लाकडाचा सेट तयार केला होता. समुद्राच्या पाण्यातून जाणाऱ्या बोटी, त्यावरचे क्रेनच्या साह्याने उचलले जाणारे कंटेनर, प्रवासासाठीचा रेल्वे रूळ अशा सगळ्या गोष्टी साकारण्याचे आव्हानच होते.’
‘त्या वेळी तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हते. दोरीच्या साह्याने सगळा देखावा उभारला. कंटेनर उचलण्यासाठी चुंबक, पाण्यातून जाणाऱ्या बोटी अशा एकेका प्रश्नावर पर्याय शोधून कार्यकर्त्यांनी देखावा यशस्वी केला होता. तो अगदी बंदरासारखाच झाला होता. बंदराची माहिती देणारी एक ध्वनिचित्रफितही लोकांना ऐकवली जायची,’ असे त्यांनी सांगितले.
भोकटे म्हणाले, ‘देखाव्याची भरपूर चर्चा झाली. गर्दीचा उच्चांक मोडला गेला. देखावा पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. वेगवेगळ्या दैनिकांमधून बातम्या छापून आल्या. केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या (सीडब्ल्यूपीआरएस) संचालकांनी भेट देऊन देखाव्याचे कौतुक केले. बंदर बनवणाऱ्या जपानी कंपनीच्या शिष्टमंडळालाही त्यांनी देखाव्याची माहिती दिली. गणेशोत्सवानंतर दोन दिवसांनी या शिष्टमंडळाने मंडळाला भेट दिली. देखावा पाहिला आणि त्यांच्या भाषेत अभिप्रायही नोंदवला.’
‘देखाव्यामुळे बंदर पाहण्याचाही योग’
पूर्वी गणेशोत्सवानंतरही दोन-तीन दिवस देखावे ठेवावे लागत असल्याची आठवणही त्यांनी नोंदवली. ‘या देखाव्यामुळे ‘जेएनपीटी’च्या अधिकाऱ्यांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांना बंदर पाहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. सामान्य माणसांसाठी खुले नसलेले हे बंदर या देखाव्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना पाहता आले,’ अशी भावना भोकटे यांनी व्यक्त केली.
काही देखावे कायम स्मरणात राहतात. दीर्घ काळासाठी मंडळाची ओळख ठरतात. आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या देखाव्यांमध्ये हा एक देखावा असाच कायम स्मरणात राहणाऱ्या देखाव्यांपैकी एक होता. – दिलीप भोकटे, अध्यक्ष, नातूवाडा मित्रमंडळ